यंदाच्या ‘शब्दस्पर्श’ दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ पाहिल्यानंतरच हा अंक पुस्तकांची मुखपृष्ठे आणि मांडणी या विषयावर आधारित असल्याचा अंदाज येतो. पुस्तकाचा दर्जा दोन गोष्टींवर ठरवला जातो. एक म्हणजे पुस्तकातील मजकूर आणि दुसरी त्या मजकुराची पुस्तकात केलेली मांडणी आणि त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि त्याची मांडणी एकमेकांत गुंतलेली असते. ती वेगळी करता येत नाही. मुखपृष्ठावरील रंग, रेषा आणि पुस्तकाची मांडणी वाचकांचे लक्ष वेधून घेते. मुखपृष्ठरचनाकारांबरोबर काम करताना आलेले अनुभव रामदास भटकळ यांनी अंगरखा या लेखात मांडले आहेत. ‘प्रकाशक-लेखक-मुद्रक : त्रिकूट’ यामध्ये ‘प्रास प्रकाशन’चे संचालक अशोक शहाणे यांची मुलाखत देण्यात आली आहे. अनिल उपळेकर, संतोष क्षीरसागर, शि. द. फडणवीस यांचे लेख वाचकांच्या ज्ञानात निश्चितपणे भर घालणारे आहेत.
संपादक : अस्मिता साठे
किंमत : १५० रुपये.
==
कोकण दिनांक
कोकणातील रासायनिक अतिक्रमण, वाढती सांप्रदायिकता आणि समाजातील विविध विषयांना स्पर्श करणारा ‘कोकण दिनांक’ हा दिवाळी अंक आहे. अभिजित हेगशेटय़े (केमिकल प्रदूषणग्रस्त दाभोळ खाडी), मुक्ता दाभोलकर (डॉ. नरेंद्र दाभोलकरांनंतर अंनिसची वाटचाल), सत्यजित चव्हाण (जैतापूर आंदोलन : समज-गैरसमज), निशिकांत जोशी (मी अनुभवलेले हमीद दलवाई) हे लेख वाचनीय आहेत.
मनीषा मगदूम (माणुसकीचा गहिवर), अशोक लोटणकर (राखण) या कथा तसेच कविता यांमुळे अंक वाचनीय झाला आहे. प्रतिभा सराफ, गौरी कुलकर्णी, अनुराधा दिक्षित, अशोक लोटणकर यांच्या कविता वाचनीय आहेत. कोकणातील विविध विषयांवर या अंकात लिखाण करण्यात आले आहे. कोकणच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
संपादक : अभिजित हेगशेटय़े
किंमत : ६० रुपये.
==
स्वप्ना
‘स्वप्ना’ हा यंदाचा दिवाळी अंक भ्रष्टाचार विशेषांक आहे. अंकातील सर्व व्यंगचित्रे भ्रष्टाचारावर भाष्य करणारी असून वाचकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटविणारी आहेत. मेघा पाटकर, विवेक वेलणकर, उत्तम कांबळे, गिरीश राऊत, चंद्रशेखर पुरंदरे, बबन लोंढे, श्रीधर मोडक, शरद बेडेकर यांनी विविध क्षेत्रातील भ्रष्टाचारावर लेखातून कडाडून टीका केली आहे. डॉ. श्रीकांत नरुले, नंदकुमार सुर्वे, गोविंद मोतलग, सु. रा. देशपांडे, गिरीश खारकर, देवबा पाटील, स्मिता देशपांडे, सुनिता गायकवाड, बाळ पोतदार, तन्मयकुमार पाटील, अनंत जोशी यांच्या कविता भ्रष्टाचारावर मिस्कील टिप्पणी करणाऱ्या आहेत. भ्रष्टाचार हा विषय आणि व्यंगचित्रे यांमुळे अंक वाचनीय ठरला आहे. भ्रष्टाचाराच्या संकल्पनेमुळे या अंकात वैविध्य आहे. सलील खान यांनीही आपल्या लेखातून भ्रष्टाचाराचा विनोदी शैलीत समाचार घेतला आहे.
संपादक : वि. द. बर्वे
किंमत : १०० रुपये.

साभार पोच..
आयुष्याचं प्रतिबिंब (संपादक : मिलिंद जोगळेकर), स्मार्ट उद्योजक (संपादक : शैलेश राजपूत), यशप्राप्ती (संपादक : यशवंत पाटील), उल्हास प्रभात (संपादक : गुरुनाथ बनोटे), वनौषधी (संपादक : सुनील पाटील), साप्ताहिक साधना (संपादक : विनोद शिरसाठ), चौफेर (संपादक : सत्यवान तेटांबे), काश्मीर (संपादक : बाळ जाधव), अथर्व संजीवनी (संपादक : शिवाजी निकाडे), श्रमिक एकजूट (संपादक : कृष्णा शेवडीकर), माझं अस्तित्व (संपादक : प्रदीप नाईक), अर्थनीती (संपादक : नयना शिंदे), दैनिक जनश्रद्धा (संपादक : सतीश शेकदार).