कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबरोबरच विद्युतीकरणाचे कामही हाती घेतले जाणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. राज्यातील अन्य रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारची मदत घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते अलिबाग येथे पत्रकारांशी बोलत होते. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गरसोय लक्षात घेऊन रोहा ते सावंतवाडी या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जाणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होईल. दुपदरीकरणाबरोबर या मार्गाचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याला निती आयोगानेही संमती दिली आहे. कोकण रेल्वेवर चालणारया सर्व गाडय़ा सध्या डिझेल इंजिनावर चालवल्या जात आहेत. विद्युतीकरणामुळे इंधनखर्चात कपात होऊ शकणार असल्याचे प्रभू म्हणाले, ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणात अनेक महत्त्वपूर्ण बंदरे आहेत. ही बंदरेदेखील रेल्वे मार्गानी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात दिघी आणि जयगड ही बंदरे जोडली जातील. कोकणच्या विकासाचे साधन म्हणून कोकण रेल्वेसाठी जे आवश्यक आहे ते मी करीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील रेल्वे मार्गाच्या विकासासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्यात पहिल्यांदाच करार झाला असून, राज्य सरकार यात १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यापूर्वी रेल्वे विकासात गुंतवणूक करण्याचा अधिकार सरकारांना नव्हता असे प्रभू यांनी सांगितले.
अलिबागला रेल्वे मार्गानी जोडण्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. मात्र राज्य सरकारशी चर्चा करून यावर निर्णय घेतेला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.