हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे आज दुपारी मोठय़ा आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्य़ात स्वागत झाले. लोणंद येथे पाचच्या दरम्यान पुढील दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पालखी सोहळ्याचे आगमन झाले.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे सातारा जिल्ह्य़ात पालखी सोहळ्याने प्रवेश करताच सातारा जिल्ह्य़ाच्या वतीने आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर, तहसीलदार शिवाजी तळपे, फलटणचे तहसीलदार विवेके जाधव यांनी माउलींच्या पालखीचे स्वागत केले.
नीरा नदीतील स्नानाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सातारा जिल्ह्य़ात प्रवेश केला. पाडेगाव येथे लाखो भाविकांनी माउलींचे दर्शन घेतले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदुंगांचा गजर आणि हरिनामात, हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माउलींचा पालखी सोहळा भक्तरसात चिंब होऊन गेला होता.
पालखी सोहळा लोणंद येथील शासकीय विश्रामगृहात पोहोचल्यावर लोणंद गावच्या वतीने सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके आदी ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. तानाजी चौकात पालखी रथातून उतरवून लोणंद ग्रामस्थांच्या वतीने वाजतगाजत पालखी तळावर नेण्यात आली. पालखी तळावर सर्व पालख्या गोलाकार उभ्या होत्या. आज पालखी सोहळ्यात लोणंदमधील मुस्लीम बांधवांनी पालखी सोहळा लोणंद मुक्कामी असल्याने शनिवारी येणारी रमजान ईद पालखी सोहळ्याच्या निरोपानंतर रविवारी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.
पालखी सोहळ्याचे चोपदारांना सव्वा किलोचा राजदंड देण्यात आला. सायंकाळच्या समाज आरतीनंतर लोणंद मुक्कामी आज पालखी सोहळा विसावला. नंतर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज भाविकांत मोठा उत्साह दिसून आला. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून वेगवेगळ्या पथकांद्वारे फलटणपर्यंतच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.