सोलापूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्यावेळी एका युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. संबंधित युवकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. संतोष खडतरे असे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव आहे.

आज (बुधवार) सकाळी सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी कार्यालयाच्या बाहेरील बाजूस अचानक गोंधळ सुरू असल्याचा आवाज आला. बाहेरच्या बाजूस संतोष खडतरे याने अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. त्याच्या हातात काडीपेटी होती. तो पेटवून घेण्याच्या तयारीतच होता. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील प्रकार टळला. संतोष हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सातोलीतील असून जेऊन पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.

संतोष याला सदर बझार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. परंतु, ऐन ध्वजारोहणाच्यावेळी हा प्रकार घडल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.