गारपीटग्रस्त शेतक-यांना भरीव व ठोस मदत देण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. दोन दिवसांत मंत्रिमंडळाची तातडीची बठक बोलावून मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. केंद्राचे पथकही उद्या (बुधवारी) राज्यात दाखल होत आहे. प्रसंगी अर्थसंकल्पाला काट देऊन शेतक-यांना राज्य सरकार दिलासा देईल. केंद्राकडूनही मोठय़ा मदतीची अपेक्षा आहे. पंतप्रधान कार्यालयाशी आपण तसा पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे मंगळवारी पीकनुकसानीची पाहणी केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री मधुकर चव्हाण, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील आदी उपस्थित होते. अशा प्रकारची नसíगक आपत्ती आपण कधीच अनुभवली नाही. अवकाळी व गारपिटीत शेतक-यांची पिके मोठय़ा प्रमाणात उद्ध्वस्त झाली. मराठवाडा व विदर्भाचा पाहणी दौरा पूर्ण होताच गुरुवारी (दि. १३) राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बठक बोलावण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, की या हानीतून शेतक-यांना बाहेर काढण्यास आपण कटिबद्ध आहोत. राज्यातील नुकसानीच्या आकडेवारीत दररोज बदल होत आहे. त्यामुळे नेमके नुकसान किती झाले, याचा अंदाज लगेच येत नाही. त्यासाठी कृषी विभाग व महसूल यंत्रणेला मिळून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत पंचनाम्याचा अहवाल केंद्राला पाठविण्यात येईल.
मदत व पुनर्वसन समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, तसेच केंद्रातील उच्चस्तरीय मंत्रिगटाचे अध्यक्ष कृषिमंत्री शरद पवार राज्याला नक्की मोठय़ा प्रमाणात मदत मिळवून देतील याबाबत आपण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व कृषिमंत्री पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून या आपत्तीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. राज्यातील शेतकऱ्याला आधार द्यावा, अशी मागणी केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
तीन मुद्दय़ांवर शेतक-यांना मदत करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. यात पिकांची नुकसानभरपाई, शेतक-यांच्या कर्जासंदर्भात मदत आणि वीजबिलात सवलतीचा समावेश आहे. यापूर्वी दोन वष्रे उस्मानाबादसह मराठवाडय़ाला दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाला. कशीबशी पिकांची उभारणी होत असतानाच पुन्हा एकदा निसर्गाची अवकृपा मराठवाडय़ासह २६ जिल्ह्यांवर झाली आहे. या दुर्घटनेत राज्यातील २२ शेतकरी मृत्युमुखी पडले. दुहेरी अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना बाहेर काढण्यास आपण जातीने काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी वादळी वाऱ्यामुळे ज्यांचे संसार उघडय़ावर पडले, त्यांना मदत करावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.
पुनर्वसनमंत्री कदम यांनीही शेतक-यांच्या पाठीशी सरकार खंबीर उभे असल्याचे सांगून मंत्रिमंडळ बठकीत सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यातील नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. खासदार डॉ. पाटील यांनी ही राष्ट्रीय आपत्ती समजून भरीव मदत करावी. काळे पडलेले धान्य खरेदीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. परिसरातील अनेक शेतक-यांनी डोळय़ांत पाणी आणून त्यांच्यावर गुदरलेला कोप मुख्यमंत्र्यांसमोर कथन केला.
जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, जि. प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, नगराध्यक्ष विद्या गंगणे, जि. प. सभापती पंडित जोकार, मुकुंद डोंगरे आदींची उपस्थिती होती.