सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ समूहाचे नाव लिहिलेल्या एका जीपमधून बुधवारी ९१ लाख ५० हजार रूपयांची रक्कम नगरपालिका निवडणुकीत चलन व्यवहारावर लक्ष ठेवणाऱ्या पथकाने बुधवारी जप्त केली होती. ही रक्कम मतदारांसाठी आणल्याचे सिद्ध झाले असून लोकमंगल समूहाने येत्या २४ तासांत यासंबंधी खुलासा करण्याची नोटीस पाठवण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

जप्त केलेली रक्कम ही ऊसाच्या टोळीला अदा करण्यासाठी होती, असे स्पष्टीकरण सुभाष देशमुख यांनी दिले होते. परंतु या रोकडमध्ये एक हजाराच्या जुन्या नोटा होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

बुधवारी उमरगा (जि. उस्मानाबाद) येथील राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर चौरस्ता येथे पोलीस व निवडणूक विभागाच्या पथकाने टाटा सुमो जीप (एमएच १३ बीएन ८६५६) जीप पकडली होती. यामध्ये ९१ लाख ५० हजार रूपयांची रोकड होती. सोलापूरमार्गे उमरगा शहराकडे भरधाव वेगात येणाऱ्या टाटा सुमोचा या पथकाला संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, पकडलेल्या सर्व नोटा एक हजार रूपयांच्या आढळून आल्या होत्या.

यापूर्वीही लोकमंगल साखर कारखान्याच्या सभासदांच्या नावाने कर्ज उचलल्याचा आरोप लोकमंगल समूहावर करण्यात आला होता.