जिल्ह्य़ात ५ वर्षांच्या आतील बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून, ११ टक्के बालके या कारणामुळे मरण पावतात, असे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान जिल्ह्य़ात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या निमित्त आयोजित आरोग्य यंत्रणेच्या बैठकीत ते बोलत होते. ग्राम बालविकास केंद्र व बाल उपचार केंद्रांची स्थापना करावी, पाच वर्षांच्या आतील सर्व बालकांची यादी करावी, ‘ओआरएस’ पाकीट वाटप करावे, मातांना शिशु पोषणासंदर्भात मार्गदर्शन करावे आदी सूचना नायक यांनी या वेळी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शाळेस किमान तासभर भेट देऊन अतिसार नियंत्रण, कुपोषण आदींसंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
अतिसार नियंत्रण, शिशु पोषण आदींसंदर्भात आशा स्वयंसेविकांमार्फत मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही. एस. भटकर यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप जाधव, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. ए. आर. गिते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शर्मा आदींची उपस्थिती होती.