इतक्या वर्षे पक्षात राहूनही राणेंना काँग्रेसची संस्कृती समजलीच नसल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणेंना लगावला. पक्षाकडे मी पद मागायला गेलो नव्हतो. त्यांनी मला हे पद दिलं होतं, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. अकोला येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी राणेंच्या आरोपांना उत्तर देताना त्यांच्यावर टीकाही केली.

राणेंना काँग्रेसची संस्कृतीच समजली नाही. काँग्रेसमध्ये कोणाला मंत्री करायचं, कोणाला काय पद द्यायचं हे मुख्यमंत्री ठरवत नाहीत. काँग्रेस अध्यक्ष, त्यांचे सल्लागार, त्यावेळचे पक्षाचे सरचिटणीस अँटोनी यांच्या बैठकीत हे ठरलं, त्यामुळे माझं पद बदललं हा त्यांचा आरोप चुकीचा आहे, असे सांगत मला श्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदी नेमल्याचे त्यांनी म्हटले.

नारायण राणेंनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देताना काँग्रेसने आपल्याला मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप केला होता. तसेच पृथ्वीराज चव्हाणांना एकदम मुख्यमंत्री करण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले होते.