दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मागील महिन्यापासून शेतकरी थंडी व पावसाचा मारा सहन करत कृषी विधेयकांना विरोध करताना दिसत आहे. आंदोलनाच्या काळात अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले असून, सोमवारी आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री सतेज पाटील यांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली. तसेच हा व्हिडीओ ट्विट करत मोदी सरकार निर्दयी असल्याचं टीकास्त्र डागलं आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असल्यानं रस्त्यांवर सगळी बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत. एका बॅरिकेट्स जवळ उभा असलेला शेतकरी अचानक कोसळला. त्यातच शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत ट्विट केलं आहे. या घटनेबद्दल सतेज पाटील यांनी दुःख व्यक्त केलं असून, केंद्र सरकारवर निशाणाही साधला आहे.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन : भाजपा नेत्याच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी रिकामी केली शेणाने भरलेली ट्रॉली

“निर्दयी मोदी सरकार! काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २ महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर ऊन, वारा पाऊस आणि बोचऱ्या थंडीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनामध्ये आतापर्यंत तब्बल ५३ शेतकरी बांधवांचा दुर्दवी अंत झाला आहे! पण, हे मुजोर मोदी सरकार त्यांच्या उद्योगपती मित्रांना फायदा व्हावा, यासाठी अजूनही प्रयत्न करत आहे. देशाचे पोट भरणाऱ्या या अन्नदात्यांना आपला आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी बलिदान द्यावे लागते, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे,” अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे.

“‘जय जवान, जय किसान’ असा नारा देणाऱ्या आपल्या भारत देशात शेतकरी बांधवांची ही दयनीय अवस्था भारताच्या परंपरेला शोभणारी नाहीये. माझी केंद्र शासनाला विनंती आहे, शेतकरी बांधवांचा अंत पाहू नका,तात्काळ हे काळे कायदे मागे घ्या,” अशी मागणीही सतेज पाटील यांनी केली आहे.