रेल्वे मंत्रालयाने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पाच नवीन गाडय़ा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आल्या. मात्र, या गाडय़ा गरसोयीच्या असल्याने मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने वेळापत्रकाचा निषेध केला आहे.
काजीपेठ-कुर्ला ही साप्ताहिक गाडी काजीपेठ येथून दर शनिवारी सायंकाळी ५.४५ निघून नांदेड येथे ७.०५, परभणी ९.१० व कुर्ला येथे रात्री ११.१५ मिनिटांनी पोहोचेल. परत कुर्ला येथून दर शुक्रवारी सकाळी ११.२५ला निघून परभणीत रात्री ११ वाजता व काजीपेठ येथे शनिवारी दुपारी ३ वाजता पोहोचेल. अठरा डब्यांची ही गाडी वेळखाऊ आहे. देवगिरी एक्सप्रेस दहा तासांत परभणीहून मुंबईला पोहोचत असताना काजीपेठ गाडी १४ तासांत पोहोचणार आहे.
मराठवाडय़ातून तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी औरंगाबाद-रेणीगुंठा ही गाडी औरंगाबाद येथून दर शुक्रवारी दुपारी ४ वाजता निघणार आहे. परभणीत रात्री ७.४० येऊन रेणीगुंठा येथे दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता पोहोचणार आहे. परत रेणीगुंठा येथून दर शनिवारी रात्री १०.०५ला निघून लातूर रस्ता, परळी, गंगाखेडमाग्रे परभणीत ७.२०ला पोहोचणार आहे. औरंगाबादला रात्री १२ वाजता पोहोचेल.
तिसरी गाडी नांदेड-औरंगाबाद एक्सप्रेस दर शुक्रवारी सकाळी ८ वाजता निघून परभणीत ९.१०ला तर औरंगाबाद येथे दुपारी १२.४५ला पोहोचणार आहे. औरंगाबाद येथून दर सोमवारी रात्री १२.४५ला निघून परभणीत पहाटे ३.३० वाजता, तर नांदेड येथे दर मंगळवारी सकाळी ६.३० वाजता पोहोचणार आहे.
कुर्ला-बिदर एक्सप्रेस दर मंगळवारी दुपारी १२ वाजता कुल्र्याहून निघून लातूर रस्तामाग्रे बिदर येथे बुधवारी रात्री ४ वाजता पोहोचणार आहे. नांदेड-बिकानेर एक्सप्रेस नांदेड येथून दर गुरूवारी सकाळी नऊला निघून पूर्णा-वसमतमाग्रे िहगोलीत ११ वाजता, तर बिकानेर येथे शुक्रवारी सकाळी ८ वाजता पोहोचेल. मात्र, या सर्व गाडय़ांचे वेळापत्रक गरसोयीचे असल्याने याचा मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेचे अरुण मेघराज यांनी निषेध केला. वेळापत्रक बदलण्याची मागणी त्यांनी केली.