करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध संस्था आणि संघटनांकडून महानगरपालिकेला मदतीचा हात देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेलाही वेगवेगळ्या उपाययोजना करता येणे शक्य होत आहे. त्याअनुषंगाने शहरातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी लुपिन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने मंगळवारी महानगरपालिकेला पाच थर्मल स्कॅनर यंत्रे दिली.

शहरात अनेक सामाजिक आणि सेवाभावी संस्था आपापल्या परीने करोना संकट काळात सामाजिक बांधिलकी ठेवत विविध पातळीवर जिल्हा प्रशासनासह महापालिकेला मदत करीत आहेत. लुपिन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी प्रत्येकी सात ते आठ हजार रुपये किंमतींची पाच थर्मल स्कॅनर यंत्रे महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख यांच्याकडे सुपूर्द केली.

याप्रसंगी संस्थेचे योगेश राऊत, संदिप झनझणे, किशोर कुळकर्णी, संदिप कुलकर्णी, उपायुक्त गणेश गिरी, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, मुख्य लेखा अधिकारी नामदेव भामरे आदी उपस्थित होते.