एखाद्या पर्यटनस्थळी किंवा काश्मीरमध्ये जसे धुके पसरते तसा अनुभव पंढरपूरकरांनी आज (बुधवार) घेतला. पहाटे दाट धुके आणि थंडी असे आल्हाददायक वातावरण दिसून आले. एकादशीनिमित्त इथे आलेल्या भाविकांसह नागरिकांनी हिवाळ्यातील या धुक्याचा आनंद घेतला.

सोलापूर जिल्हा हा उष्ण प्रदेश म्हणून ओळखला जातो. पावसाळा मध्यम तर हिवाळा अत्यल्प असे काही कमी जास्त प्रमाणात वातावरण असते. यंदा तर पावसाने राज्यात अनेक ठिकाणी दडी मारली होती. त्याचा परिणाम हिवाळ्यावर जाणवेल असा अंदाज होता. मात्र गेले दोन दिवस पंढरपुरात कडाक्याची थंडी पडली होती. त्यात आज पहाटे धुके पसरले होते.

आज मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी आहे. या निमित्त हजारो भाविक पंढरीत विठुरायाच्या दर्शनाला आले आहेत. पहाटे चंद्रभागा नदीचे स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना वेगळाच अनुभव आला. सकाळी ८ वाजेपर्यंत दाट धुके असल्याने वाहन चालकांसह अनेकांची तारांबळ उडाली होती. तर ग्रामीण भागात ऊस तोडणी करण्यासाठी आलेल्या मजुरांना काम सुरु करण्यासाठी सकाळचे दहा वाजले. असे असले तरी यंदाच्या हिवाळ्यातील धुक्याचा अनुभव भाविकांसह पंढरपूरकरांनी घेतला.