पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने गांधी परिवाराचा अपमान करत असतानाच त्यांच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी गेले काही दिवसांपासून इंदिरा गांधी यांच्यावर स्तुतीस्तुमने उधळत आहे. मोदींच्या विरोधात गडकरी ही भूमिका का घेत आहे, याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी माजी आमदार आशीष देशमुख यांनी केली आहे.

आशीष देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत नितीन गडकरी यांच्या विधानांबाबत भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेल्या गडकरी यांच्या गेल्या काही महिन्यांमधील विधानावरुन मनातील खदखद दिसून येते. अमित शाह यांनी नितीन गडकरी यांना जाहीरनामा समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर घेतले नाही. गेल्या निवडणुकीत गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने व्हिजन डॉक्यूमेट तयार केले होते, याकडेही देशमुखांनी लक्ष वेधले.

गडकरी हे जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर स्तुतीस्तुमने उधळत आहेत. मोदी आणि शहा यांच्याकडून अपमानित होत असल्याने मोदींच्या विरोधात ते भूमिका घेत आहे का, त्यांच्या मनात कोणाची भीती आहे,याचे उत्तर गडकरींनी द्यावे, असे त्यांनी सांगितले.

पाच राज्याच्या निकालानंतर त्यांनी नेतृत्वाने अपयशाची जबाबादारी घेणे शिकले पाहिजे, असे गडकरींनी म्हटले होते. मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत प्रचारासाठी वापरलेले अच्छे दिन हे गली हड्डी बनली, असेही त्यांनी म्हटले होते. अरुणाचल प्रदेशामध्ये देशातील सर्वात लांब पुलाचे लोकार्पण झाले. यावेळी गडकरी उपस्थित नव्हते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.