गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भू-सुरूंग स्फोटात शहीद झालेले जवान दीपक रतन विघावे यांच्यावर सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजता खंडाळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपस्थित असलेला मोठा जनसमुदाय शोकसागरात बुडाला होता.
चामोशी तालुक्यातील पोर नदीच्या पुलावर नक्षलवाद्यांनी रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भू-सुरूंग स्फोट घडविला. यात महाराष्ट्र पोलिसांच्या सी ६० दलाचे सात जवान शहीद झाले. खंडाळा(ता. श्रीरामपूर) येथील दीपक विघावे यांचा समावेश होता. आज दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने अशोकनगर फाटा येथे आणण्यात आले. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे, प्रांताधिकारी प्रकाश थविल, तहसीलदार किशोर कदम, पोलीस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, सचिन गुजर, सिद्धार्थ मुरकुटे, बाबा दिघे, करण ससाणे, सुनीता गायकवाड, सदा कराड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
शहीद दीपक यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या रुग्णवाहिकेतून अशोकनगर फाटा ते खंडाळा दरम्यान अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेसमोर दीपक यांना मानवंदना देण्यासाठी शेकडो तरुणांनी मोटारसायकल रॅली काढली होती. भारत माता की जय, वंदे मातरम, दीपक अमर रहे अशा घोषणा या वेळी देण्यात येत होत्या. शहरातून अंत्ययात्रा जात असताना रस्त्यात ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण केले. बाजार समितीच्या वतीने सभापती दीपक पटारे, संचालक गिरिधर आसने, यांच्यासह पदाधिका-यांनी पुष्पचक्र अर्पण केले. ठिकठिकाणी यात्रा थांबवून लोकांनी शहीद दीपक यांचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यसंस्कारापूर्वी पोलिसांनी बंदुकीतून तीन फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद विघावे यांच्या पश्चात वडील, पत्नी ज्योती, मुलगा यश, मुलगी खुशी असा परिवार आहे.
अंत्ययात्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार जयंत ससाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे, सिद्धार्थ मुरकुटे, बाजार समिती सभापती दीपक पटारे, सचिन गुजर, सदा कराड, प्रांताधिकारी प्रकाश थविल, तहसीलदार किशोर कदम आदी उपस्थित होते.