गडचिरोलीतील नक्षलवादी कारवायांना सुरक्षा दलांनी मोठा हादरा दिला आहे. रविवारी झालेल्या चकमकीत आणखी ११ नक्षलवाद्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी ११ नक्षलवाद्यांचे मृतदेह इंद्रावती नदीत सापडले आहेत.

भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील बोरिया जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने शनिवारी रात्रीपासून शोधमोहीम राबवली होती. रविवारी नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी चारही बाजूंनी घेरून गोळीबार केला. त्यात १६ नक्षलवादी ठार झाले. गोळीबार बंद झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या पाहणीत त्यांना नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले. मात्र आता हा आकडा ११ ने वाढून २७ वर पोहोचला आहे. इंद्रावती नदीत आणखी ११ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. मृतदेहांसोबत काही बंदुकाही पाण्यात सापडल्या आहेत.

रविवारी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य व जहाल कमांडर साईनाथ ऊर्फ डोलेश मडी आत्राम (३५) व श्रीणू ऊर्फ श्रीकांत ऊर्फ रोवूथू विजेंद्र नरसिम्हा रामडू (३८) या तिघांचा मृत्यू झाला होता. आत्तापर्यंत पोलिसांना मिळालेल्या मृतदेहांपैकी ११ नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. उर्वरित नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

सोमवारी देखील गडचिरोलीत चकमक झाली होती आणि या चकमकीत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा झाला होता. गेल्या तीन दिवसांत एकूण ३३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.