अण्णासाहेब चिरमुले यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त येत्या रविवारी (२२ जून) ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
बँकिंग व विमा क्षेत्रात उत्तुंग कतृत्व गाजविणारे विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले ट्रस्टने रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत गिरीश कुबेर यांचे ‘राजकारण व अर्थकारणाची भावी दिशा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्ताबदल झाला असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे भावी काळात देशाच्या राजकारण व अर्थकारणात अनेक बदल अपेक्षित आहेत. त्यांचा वेध श्री. कुबेर आपल्या व्याख्यानात घेतील. रविवारी (दि. २२) सायंकाळी ६ वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, सिटी पोस्टासमोर, राजपथ, सातारा येथे या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन चिरमुले ट्रस्टचे विश्वस्त अरुण गोडबोले, पी. एन.जोशी,  श्रीकांत जोशी आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.