रस्त्याऐवजी इमारतीत शिरून लुटण्याच्या घटना

वसई : वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरांत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. पूर्वी सोनसाखळी चोर रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढत होते, आता मात्र इमारतीत शिरून नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरू लागले आहेत. चोरांची ही नवीन पद्धती असून नागरिकांनी अधिक सावध राहण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावरून पायी जाणाऱ्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याच्या घटना घडत आहेत. प्रभात फेरीसाठी, मंदिरात देवदर्शनासाठी जाणारे वरिष्ठ नागरिक, महिलांना सोनसाखळी चोरांकडून लक्ष्य केले जात असते. दुचाकीवरून भरधाव वेगाने यायचे आणि गळ्यातील सोनसाखळी खेचून काही क्षणात पसार व्हायचे अशी या चोरांची पद्धती असते. असे सोनसाखळी चोर पोलिसांची डोकेदुखी बनले होते. आता मात्र या सोनसाखळी चोरांनी आपल्या कार्यपद्धतीत वेगळा बदल केला आहे. ज्येष्ठ नागरिक इमारतीत शिरत असताना त्यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करण्यात येऊ लागली आहे. अशा प्रकारचे तीन गुन्हे एकाच आठवडय़ात भाईंदर, विरार आणि माणिकपूर पोलिसांच्या हद्दीत घडले आहेत. इमारतीत ज्येष्ठ नागरिक शिरत असताना हे सोनसाखळी चोर त्याच वेळी आत शिरण्याचा किंवा आतून बाहेर येण्याचा बहाणा करत धक्का मारून अचानक गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेऊ लागले आहेत. इमारतीत इतर माणसे नसतात, त्याचा फायदा या सोनसाखळी चोरांना मिळतो आणि ती संधी साधून ते या चोरीचे कृत्य करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. ज्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षारक्षक नाहीत अशा ठिकाणी या घटना घडत आहेत.

आयुक्तालयांचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. महेश पाटील यांनी सांगितले की, सोनसाखळी चोरांची ही नवीन कार्यपद्धती आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर्वीपेक्षा अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आम्ही अशा अनेक सोनसाखळी चोरांना पकडत आहोत असेही ते म्हणाले.

संचित रजेवर आलेल्या गुन्हेगारांचा सहभाग

वाढत्या गुन्हेगारीबद्दल पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी हजारो गुन्हेगारांना संचित रजेवर (पॅरोल) सोडण्यात आले होते. ते सर्व गुन्हेगार विविध गुन्ह्यंमध्ये सक्रिय झाल्याचे पोलिसांनी सांगितले. करोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळेदेखील गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.