कोकणात प्रथमच होत असलेल्या कुत्र्यांच्या पेट शोमध्ये येत्या रविवारी (२८ एप्रिल) तब्बल एक लाख रुपये किमतीचा गोल्डन रिट्रिव्हर जातीचा श्वान श्वानप्रेमींना बघायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत रत्नागिरी शहर आणि जिल्ह्य़ामध्ये जातिवंत कुत्रे पाळण्याची आवड झपाटय़ाने वाढली आहे. पण त्यांचे योग्य पालन आणि निगा राखण्याबाबत अज्ञान आढळून येते. ते दूर करून शास्त्रीय पद्धतीने श्वानपालनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने येथील समर्थ पेट क्लिनिक आणि एफर्ट जिम यांच्यातर्फे कोकणात प्रथमच हा शो होत आहे. येथील विवेक हॉटेलच्या मैदानावर होणाऱ्या या पहिल्यावहिल्या उपक्रमाबाबत माहिती देताना डॉ. अविनाश भागवत यांनी सांगितले की, रत्नागिरी शहरात श्वानप्रेमींची संख्या मोठी आहे. त्यापैकी अनेकांनी जातिवंत कुत्रे पाळले आहेत. पण एकाच ठिकाणी ते बघायला मिळण्याची संधी नव्हती. या पेट शोच्या निमित्ताने प्रथमच असा उपक्रम होत आहे.   या शोमध्ये डॉबरमन, जर्मन शेफर्ड, लॅब्रेडॉर, लासाअॅप्सो, फॉक्स टेरियर, सेंट बर्नार्ड, सायबेरियन हस्की इत्यादी विविध जातींचे श्वान बघायला मिळणार असून, मुंबईच्या आशुतोष आपटे यांच्या मालकीचा ‘टस्कर’ हा गोल्डन रिट्रिव्हर शोचे मोठे आकर्षण राहणार आहे. देशातील विविध डॉग शोमध्ये पुरस्कार मिळालेल्या टस्करची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. या शोमध्ये चाइल्ड हॅन्डलिंग आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धाही होणार असून शोमधील उत्कृष्ट श्वानांसाठी रोख पुरस्कार ठेवण्यात आले आहेत.