राज्य सरकारने केलेली टोलबंदीची घोषणा फसवी असून याआधी रद्द केलेल्या ६५ टोलनाक्यांच्या यादीचे काय झाले असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी सरकारसमोर उपस्थित केला आहे. ते नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यातील ४४ टोल रद्द करण्याच्या आघाडीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राज म्हणाले की, राज्य सरकारकडे टोलवसुलीबाबत पारदर्शकता नाही. केवळ ४४ टोलनाके बंद केल्याच्या निर्णयावर मी अजून समाधानी नाही. नुसते फुटकळ टोलनाके बंद केल्याने जनतेवरील जाच काही कमी होणार नाही. यापूर्वीच बंद झालेले टोल बंद करण्याची घोषणा सरकारने केली. मूळात टोलवसुलीतच पारदर्शकता नाही त्यामुळे सरकारची ही घोषणा फसवी आहे.” असेही राज ठाकरे म्हणाले.
टोलसोबतच कॅम्पाकोला प्रकरणावरही राज यांनी राज्यसरकारला धारेवर धरले, कॅम्पाकोला वासियांच्या प्रश्न नसून हा अनधिकृत बांधमांबाबतील सरकारच्या भूमिकेचा प्रश्न आहे. अनधिकृत बांधकामात फक्त नागरिकांवरच कारवाई होते संबंधित बिल्डरांवर कारवाई झाल्याचे मला आजपर्यंत आढळून आलेले नाही. बिल्डर, अधिकारी काहीही करत सुटतात आणि त्याची भरपाई नागरिकांना भोगावी लागते हे कोणते शासन असल्याचा सवालही राज यांनी यावेळी उपस्थित केला.