येथील किराणा मार्केटमधील प्रसिद्ध धडवाईचे हनुमान मंदिर, माणिकचंद राठोड, सीताराम अँड कंपनीसह आजूबाजूची ८ दुकाने मंगळवारी पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आगीत लाखोंचे नुकसान झाले. अग्निशामक दलाचे पथक वेळीच आल्याने परिसरातील दुकाने वाचली. आगीचे कारण समजू शकले नाही.
येथील महात्मा गांधी पुतळय़ासमोर असलेल्या किराणा मार्केटमध्ये अत्यंत जुने व व्यापाऱ्यांसाठी प्रतिष्ठेचे असलेले हनुमान मंदिर, माणिकचंद बाबुलाल राठोड, सीताराम अँड कंपनी, राजाराम सुधाकर गंडेवार (किराणा), अनिता ड्रेसेस, विजयकुमार गुंडेवार (किराणा), अजिजभाई इलेक्ट्रिकल्स व लोलगे यांच्या दुकानास पहाटे आग लागली. पहाटे पाचच्या सुमारास माणिकचंद राठोड यांच्या दुकानासमोर असलेल्या मोटारीच्या (एमएच ३८/६२८१) वाहनाचे टायर आगीत फुटल्याने आवाज झाला आणि परिसरातील लोक घटनास्थळाकडे धावले. तात्काळ िहगोली व कळमनुरी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या पथकाला पाचारण केले. सकाळी सातपर्यंत अग्निशामक दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण केले.
आगीत सीताराम अँड कंपनी या किराणा दुकानात असलेल्या साखर, बिडीकाडी, पारले व सर्व किराणा दुकानातील सुमारे ७ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. माणिकचंद राठोड यांचे रॉकेलचे दुकानदार म्हणून सर्वदूर लौकिक आहे. परंतु त्यांच्याकडे रॉकेलचा साठा नव्हता. त्यांच्या दुकानासमोर असलेली ६ लाखांची मोटार व दुकानातील साहित्यासह २०-२५ लाखांचे नुकसान झाले. या फर्मचा मोठा व्यवहार असल्याने दुकानात वही खाते व सर्व टॅक्सबाबतची कागदपत्रे जळून त्याचा कोळसा झाला. विशेष म्हणजे ही दोन्ही दुकानांवर जुने लाकडी माळवद असल्याने लाकडांनी पेट घेतला. त्यामुळे दुकानातील संपूर्ण मालाचा कोळसा होऊन यांचे मोठे नुकसान झाले.
हनुमान मंदिराला लागून गुंडेवार यांच्या अनिता ड्रेसेसमधील संपूर्ण माल जळून खाक झाला. विजयकुमार गुंडेवार व राजाराम सुधाकर गुंडेवार या दोन किराणा दुकानांना आग लागून बरेच साहित्य जळाले. आग विझवताना दुकानात फवारलेल्या पाण्यामुळे संपूर्ण मालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही दुकानदारांचा लाखो रुपयांचा माल जळाला, तर काही मालाचे नुकसान झाले.
सीताराम अँड कंपनीला लागून असलेल्या अजिजभाई मोबाइल शॉपी, इलेक्ट्रिकल यांची दुकानेही जळून एक ते दीड लाखाचे नुकसान झाले. त्याला लागून लोलगे यांचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे कारागीर असून त्यांच्या दुकानातील संपूर्ण साहित्य जळाल्याने ४० ते ५० हजारांचे नुकसान झाले. परिसरात धडवाईचा हनुमान व्यापाऱ्यांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित असलेल्या जुन्या मंदिरालाही आग लागून मंदिराचे मोठे नुकसान झाले. मंदिरात सकाळी सहापासून भाविक दर्शनासाठी रोज गर्दी करतात. आगीमुळे भक्तांना हनुमानाचे दर्शन घडले नाही.
आगीची घटना कळताच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, उपनगराध्यक्ष जगजितराज खुराणा, भाजपचे शहराध्यक्ष मनोज शर्मा यांच्यासह व्यापारी, सामाजिक कार्यकत्रे, नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने घटनास्थळी धावले. सर्वानी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीचे कारण कळू शकले नाही. परंतु शॉटसíकटमुळे मध्यरात्रीच्या सुमारास एखाद्या दुकानात आग लागली असावी, त्या आगीने आजूबाजूचा परिसर घेरला. पहाटे मोटारीचे टायर फुटल्यामुळे झालेल्या आवाजाने सर्वाचे लक्ष याकडे वेधले गेले.