येथील एका मुख्याध्यापिकेने शाळेतच गळफास लावून बुधवारी आत्महत्या केली. विद्या दत्तात्रय जाधव, वय ५५, रा. आंबेडकर नगर, सामाजिक भवन नजीक असे या शिक्षिकेचे नांव आहे. आíथक दबावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.
जाधव या आंतरभारती शिक्षण मंडळाच्या वसंतराव चौगुले प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या. संस्थेने त्यांना प्राप्तिकर विभागाचा १ लाख ३० हजार रूपये दंड भरावा लागेल असे सांगितले होते. यामुळे त्या प्रचंड तणावाखाली होत्या. या तणावातूनच त्यांनी संस्थेच्या वि.स. खांडेकर प्रशालेच्या दुसऱ्या मजल्यावरील एका वर्गात ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची नोंद शाहुपूरी ठाण्यात झाली आहे. जाधव यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त सहकारी शिक्षकांना समजल्यावर त्यांना अश्रू रोखणे कठीण झाले होते. जाधव यांचे पती दत्तात्रय जाधव यांनी शिक्षण संस्थेच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला. तर शिक्षण संस्थेचे सचिव एम.एस. पाटोळे यांनी जाधव यांच्या आत्महत्येमागे संस्थेचा कोणताही दोष नसल्याचे सांगितले. विद्या जाधव यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.