रोहा, महाड, नागोठणे परिसराला पुराचा तडाखा, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत

रायगड जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड, रोहा आणि नागोठणे परिसराला पुराचा तडाखा बसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पनवेल तालुक्यातील पांडवकडा येथे पाच जण वाहून गेले.  मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. पाली ते वाकण, माणगाव ते श्रीवर्धन मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. रोहा तालुक्यातील रोठ, आंबेवाडी, कोलाड येथील ७० कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले.

प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्य़ात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्य़ातील बहुतांश भागांत पावासाच्या जोरदार सरी कोसळण्यास होत्या. रोहा, सुधागड, महाड पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा या तालुक्यांत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीच कुंडलिका, सावित्री आणि अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली. नागोठणे, रोहा आणि महाड परिसराला पुराचा तडाखा बसला. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रोहा येथे अष्टमी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. महाडमध्ये दादली पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद केली होती. मोर्बा येथील पुलावर पाणी आल्याने श्रीवर्धनकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती, तर पाली वाकण मार्गावरही पुराचे पाणी आल्याने, या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान दुपारनंतर नद्यांची पातळी घटली. त्यामुळे पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली.

शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी १६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रोहा येथे २९५ मिलिमीटर, पोलादपूर येथे २४५, माणगाव येथे २२६, तळा येथे २१०, माथेरान येथे २०६, म्हसळा येथे २००, महाड येथे १८८, सुधागड येथे १७५, मुरुड येथे १५९, श्रीवर्धन येथे १३५, पेण येथे १२२, कर्जत येथे ११७, अलिबाग येथे १०६, खालापूर येथे १००, पनवेल येथे ७६, तर उरण येथे ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्य़ात दरवर्षी साधारणपणे ३ हजार १४२ मिलिमीटर पाऊस पडतो. या तुलनेत या वर्षी २ ऑगस्टपर्यंत २ हजार ७७४ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा ८८ टक्के पाऊस पडला आहे.

महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीचा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. कशेडी घाटात धामणदेवी आणि चौळई येथे दरडी कोसळल्या. त्यामुळे वाहतूक चार ते पाच तास ठप्प झाली होती. दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. शनिवारी दुपारनंतर माणगाव येथील कळमजे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. गोद नदीच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पोलीस आणि महसूल विभागाला दिला. यानंतर या पुलावरून दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली. गोव्याकडून येणारी वाहतूक निजामपूरमार्गे, तर मुंबईकडून येणारी वाहतूक कोलाडमार्गे वळविण्यात आली.

सोन्याची वाडीच्या ६० ग्रामस्थांची पुरातून सुटका

माणगाव तालुक्यातील गोरेगाव जवळील सोन्याची वाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या ६० ग्रामस्थांची बचाव पथकाने सायंकाळी सुटका केली . त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे . यामध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे.

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सोन्याची वाडी या वस्तीला पाण्याचा वेढा पडला आणि सर्व ग्रामस्थ आत अडकून पडले . पाण्याची पातळी वाढत गेल्याने सारेच भयभीत झाले होते . या माहिती प्रशासनाला मिळताच माणगावच्या प्रांताधिकारी प्रचाली दिघावकर सर्व महसूल कर्मचाऱ्यांसह सोन्याची वाडी येथे दाखल झाल्या . कोलाड येथील महेश सानप यांच्या राफटर पथकाला तत्काळ पाचारण करण्यात आले . पथकातील सदस्यांनी बोटीच्या सहायाने वस्तीवर जावून सर्व ग्रामस्थांना पूरातून बाहेर काढून त्यांची सुटका केली . या सर्व ग्रामस्थांना आता जवळच्याच नागाव येथील प्राथमिक शाळेत तसेच दत्तमंदिरात तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोन्याची वाडी या वस्तीला दरवर्षी पावसाळयात अशाचप्रकारे पुराचा सामना करावा लागतो. मात्र आता त्यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे .