News Flash

टाळेबंदीमुळे नोकरीवर गदा, रोजगाराच्या शोधासाठी वाहतुकीचा अभाव!

उपनगरी गाडय़ा बंद असल्याने पालघर जिल्ह्य़ातील उच्चशिक्षितांपुढील आर्थिक संकट गहिरे

उपनगरी गाडय़ा बंद असल्याने पालघर जिल्ह्य़ातील उच्चशिक्षितांपुढील आर्थिक संकट गहिरे

पालघर : वेगवेगळ्या देशांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ करोनाकाळात नोकऱ्या गमावून बसले आहेत. त्यात उपनगरी गाडय़ांची सेवा बंद असल्याने बेरोजगार युवकांसमोरील आर्थिक संकट अधिकच गहिरे होत चालले आहे. रेल्वे प्रवास बंद असल्याने रोज खासगी वाहनाने मुंबईसाठी प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी स्थानिक पातळीवरच नोकऱ्या मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मुंबई शहरात ज्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पाणी, दूध व भाजीपाला दररोज नेण्यात येतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे सर्व स्तरांतील कामगार व अधिकारी या भागातून दररोज मुंबईला प्रवास करतात. शासकीय सेवेतील तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुविधा सुरू करण्यात आली असली तरी खासगी सेवेत असलेल्या नागरिकांना राज्य परिवहन सेवेतील एसटी बसच्या माध्यमातून प्रवास करणे  आर्थिकदृष्टय़ा शक्य नाही. यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मुंबई व उपनगरात मिळणारा पगार ग्रामीण भागात मिळत नसल्याने अनेकांनी काही दिवस घरी राहून परिस्थिती पूर्ववत होण्याची वाट पाहिली. काही दिवसांनंतर आपण पुन्हा पूर्वीच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी कामावर रुजू होऊ  अशा आशेवर होते. मात्र करोनास्थिती तशीच कायम राहिल्याने नव्या नोकरीचा शोध सुरू केला आहे.

भरतीस सुरुवात नाही

मंदीच्या सावटामुळे औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ मर्यादित आहे. याशिवाय शासनाकडून वेळोवेळी जारी केल्या जात असलेल्या सूचनांमुळे नव्या भरतीस उद्योजकांनी अद्याप सुरुवात केलेली नाही. हीच स्थिती सेवा क्षेत्रातील मंडळींची आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण मिळेल ते काम करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. अनेकांना आपले घरसंसार चालवणे, विमा व कर्जाचे हप्ते भरणे कठीण होत आहे. काम करण्याची इच्छा असताना आपल्या भागात काम मिळत नसल्याने तरुण मंडळींची घुसमट होत असल्याची स्थिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 2:51 am

Web Title: highly educated in palghar district face financial crisis due suburban local trains close zws 70
Next Stories
1 एसटीत दाटीवाटी
2 राष्ट्रीय महामार्गावर कचरा टाकणाऱ्या कारखान्यांचा कचऱ्यातून शोध
3 जव्हारचा पर्यटन व्यवसाय करोनामुळे अडचणीत
Just Now!
X