वारीच्या वाटेवर जोरदार पाऊस होता. त्यामुळे अंगात खोळ घालून वारकऱ्यांची पावले पुढे पडत होती. पावसातही हरिभक्तीचा कल्लोळ जराही कमी झालेला नव्हता. पावसामुळे माळरानावरील खाच-खळगे पाण्याने भरून वाहत होते. नांगरलेल्या शेतांमध्ये चिखल झाला होता. अशा वातावरणात पुढे जात असताना महिला वारकऱ्यांसोबत चालणारी एक वयोवृद्ध माउली काहीतरी गुणगुणत पुढे चालली होती. शब्द स्पष्ट कळत नव्हते, पण ही माउली पावसावर काहीतरी म्हणते आहे, हे कळाले. ते शब्द त्या माउलीलाच विचारावेत म्हणून, ‘‘माउली, काय म्हणताय ते सांगा की जरा’’ असा प्रश्न केला. त्यावर ती गरीब माउली हसली अन् तोंडावर पदर धरून म्हणाली ‘‘म्हन्ते आपलं काहीबाही,’’ जरा जास्तच आग्रह केल्यानंतर ते शब्द तिने पुन्हा गुणगुणले.
पाऊस पडला, चिखुल झाला;
भिजला हरीचा विणा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा..!
अशा त्या ओळी होत्या. त्या कुणी लिहून दिलेल्या नव्हत्या किंवा तिने त्या पाठही केलेल्या नव्हत्या. पडलेला पाऊस व त्यामुळे निर्माण झालेली स्थिती अन् त्यात चाललेली विठ्ठलाची भक्ती, अशा वातावरणात आपोआपच या माउलीच्या मुखातून या ओळी बाहेर पडल्या होत्या. अशिक्षित असलेली ही माउली जे काही म्हणत होती, ते तिच्यापुरतेच मर्यादित व केवळ तिच्याच आनंदासाठी होते. पण, त्यातून काहीतरी निर्माण होते आहे, हे तिच्या गावीही नव्हते. पंढरीच्या वाटेवर चालताना अशा अनेक ओळी प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांकडून गुणगुणल्या जातात. पूर्वी भल्या पहाटे उठून महिला जात्यावर दळण दळीत होत्या. विजेवर चालणाऱ्या पिठाच्या गिरण्या आल्या अन् घरातले जाते शहरांतील वस्तुसंग्रहालयात आले. या बदलामुळे जात्यावरची मौखिक साहित्याची नवनिर्मितीही थांबली. पण, जात्यावर नसली तरी ही मौखिक साहित्याची परंपरा वारीच्या माध्यमातून आजही टिकून आहे.
‘चला एखादी ओवी म्हणा,’ असे सांगितले म्हणून ओवी तयार होत नव्हती. जाते गरगर फिरायला लागले, की त्याबरोबरीने शब्दही आपसूकच बाहेर पडत होते. तसाच प्रकार वारीच्या वाटेवरही आहे. भक्तिभावाने पंढरीच्या वाटेवर चालत असताना या महिलांच्या मुखातून अनेक ओळी आपोआपच बाहेर पडतात. िदडीची रचना लक्षात घेतली, तर पुढे पुरुष मंडळींचे टाळ-मृदंगांच्या गजरात अभंग सुरू असतात. तर त्यांच्यामागे वृंदावन, पाण्याचा हंडा व साहित्याच्या पिशव्या डोक्यावर घेऊन महिला चालत असतात. मागे चालत असताना या महिला वेगळेच काही गुणगुणत असतात. प्रामुख्याने खांदेश, विदर्भ, मराठवाडय़ातून आलेल्या िदडय़ांमध्ये हे दिसून येते. जात्यावरील ओव्यांमध्ये प्रामुख्याने माहेर, तेथील माणसे, सासर, संसार आदी विषय होते.
विठू राजा माझा बाप;
माय झाली रखुमाई
माहेराला जाता जाता;
 सुख भेटे ठायी ठायी
यांसारख्या अनेक ओळींमधून पंढरीच्या वाटेवरही माहेराची गोडी दिसून येते. सुखाच्या ओव्यांबरोबर जात्यावर बसणारी माउली आपले दु:खही मांडत होती.
पंढरीला जाईन,
तिथं मागणं मागीन
तुझी करीन मी सेवा,
भोगं सरू दे गा देवा
पंढरीनाथाच्या आनंदमय भक्तीबरोबरच काही वेदनाही अशा स्वरूपात बाहेर पडत असतात. अशा अनेक ओळी हजारो माउलींनी मनात जपून ठेवल्या आहेत. वारीच्या वाटेवर त्या नवनवे रूप घेऊन मुखातून बाहेर पडतात. वारीला कितीही आधुनिकता आली असली तरी हा जुना बाज टिकून असल्यानेच आजही वारीतील गोडी कायम आहे.