06 March 2021

News Flash

कोकण रेल्वेतर्फे ‘हमसफर’ सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा

गेल्या २८ मे रोजी रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेने सुरू झालेल्या या सप्ताहाची आज सांगता झाली.

प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सोई-सुविधांचा आढावा घेत अभिनव उपक्रमांव्दारे कोकण रेल्वे महामंडळातर्फे ‘हमसफर’ सप्ताह साजरा करण्यात आला.
गेल्या २८ मे रोजी रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेने सुरू झालेल्या या सप्ताहाची आज सांगता झाली. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी सांगितले की, सप्ताहाच्या पहिल्या दिवशी हाती घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सुमारे चार ते पाच टन कचरा गोळा करण्यात आला. २९ मे रोजी रेल्वे स्थानकांवरील खाद्य-पेयांच्या स्टॉल्सची पाहणी करून नियमपालनाबाबत निरीक्षण करण्यात आले. ‘सेवा दिवस’ या उपक्रमांतर्गत सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी पॅसेंजर गाडय़ांमधील प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. तसेच या वेळी त्यांनी केलेल्या सूचनांचीही नोंद करण्यात आली. त्यापैकी मुख्य मुद्दा तिकिटांच्या उपलब्धतेबद्दल होता. त्याबाबतच्या मर्यादा आणि वस्तुस्थिती त्यांना समजावून सांगण्यात आली. सप्ताहाच्या ‘सतर्कता दिवस’ मोहिमेअंतर्गत रेल्वेगाडय़ांमधून विनातिकीट किंवा चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सुमारे साडेतीनशे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यापैकी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण फक्त सुमारे २० टक्के होते. त्यामध्ये मुख्यत्वे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा होता. याव्यतिरिक्त वृक्षलागवडीचा शुभारंभ करून ‘सामंजस्य दिवस’, तर मालवाहतूक करणाऱ्या संस्थांशी भावी नियोजनाबाबत चर्चा करून ‘संयोजन दिवस’ साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षांत कोकण रेल्वेतर्फे विस्ताराच्या निरनिराळ्या योजना हाती घेण्यात आल्या असल्याचे नमूद करून निकम म्हणाले की, मडगाव रेल्वे स्थानकाप्रमाणेच रत्नागिरी स्थानकावरही वाय-फाय सुविधा येत्या सुमारे १५ दिवसात सुरू होणार आहे. नियोजित चिपळूण-कराड रेल्वेमार्गासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच जयगड-डिंगणी रेल्वेमार्गावर २०१८च्या अखेपर्यंत मालवाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. मान्सूनच्या काळात दुर्घटना घडू नयेत यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून मार्गावरील ६४ ठिकाणी विशेष सतर्कता बाळगली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 1:26 am

Web Title: humsafar week celebration in konkan railway
टॅग : Konkan Railway
Next Stories
1 धुळे पालिका आयुक्तांविरूद्ध अविश्वास ठराव मंजूर
2 नाटे येथील जेटी प्रकल्पाला आंबोळगडचा पाठिंबा
3 एकाच दिवशी तब्बल १४१ कर्मचारी निवृत्त
Just Now!
X