12 August 2020

News Flash

“मी मोदींच्या चेंबरमध्ये गेलो आणि त्यांना सांगून आलो की…”; राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात पवारांचा खुलासा

"राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी मोदींनी हस्तक्षेप करावा आणि..."

फाइल फोटो

महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यामध्ये सत्तावरुन निर्माण झालेल्या गोंधळाच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मध्यस्थी करुन राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देईल असा विचार महाराष्ट्रातील भाजपा नेते करत होते असंही पवारांनी म्हटलं आहे. मात्र आपण पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केल्याची माहिती पवारांनी दिली आहे. पवारांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खास मुलाखत घेतली असून या मुलाखतीतच पवारांनी मोदींच्या भेटीसंदर्भातील खुलासा केला आहे.

“२०१९ ला राज्यात जे तीन पक्षांचं सरकार बनलं आहे. त्या सरकार स्थापनेच्या दरम्यान किंवा त्याआधी सुद्धा राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा असा उल्लेख करत फडणवीस यांनी ‘ते भाजपाबरोबर सरकार बनवण्यासंदर्भात अंतिम टप्प्यात चर्चा करत होते. नंतर पवारांनी अचानक यू-टर्न घेतला’ असा आरोप केला आहे,” असा प्रश्न राऊत यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी पंतप्रधानांबरोबर माझे चांगले संबंध असल्याने राष्ट्रवादी भाजपाला पाठिंबा देईल अशी राज्यातील नेत्यांची अपेक्षा होती असं म्हटलं आहे. यासंदर्भात चर्चा होताना भाजपाने सत्ता स्थापनेत आम्हाला शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही असं सांगितल्याचा खुलासा पवारांनी केला आहे.

नक्की वाचा >> …म्हणून आम्ही २०१४ साली भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला : शरद पवार

तो निरोप माझ्या कानावर आला…

“साधी गोष्ट आहे की शिवसेनेला आम्हाला बरोबर घ्यायचं नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये येऊन आम्हाला स्थिर सरकार बनवायला साथ द्या असं भाजपाचे काही नेते आम्हा लोकांशी बोलत होते. आमच्यातल्या काही नेत्यांनी आणि माझ्याशीही एक दोन वेळा नाही तीन वेळा बोलले. बोलले नाहीत असं नाही याबद्दल बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांची अशी अपेक्षा होती की पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि मी त्यांना समर्थन देईन. हा निरोप माझ्या कानावरही आला होता,” असं पवार राऊतांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

मोदींच्या चेंबरमध्ये गेलो आणि सांगून आलो…

“देशाच्या प्राधानमंत्र्यांसमोर आपल्याबद्दल किंवा आपल्या पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वत: संसदेमध्ये पंतप्रधानांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. जमल्यास आम्ही शिवसेनेबरोबर सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू. पण आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही असं मी त्यांना सांगून आलो,” असं पवारांनी पुढे म्हटलं आहे.

नक्की वाचा >>  “मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस लोकांना माहित झाले”; ‘त्या’ प्रश्नावरुन पवारांचा टोला

एक व्यक्ती बाजूला बसली होती…

“मी मोदींना हे सांगायला जाताना लोकसभेमध्ये एक गृहस्थ माझ्या शेजारी बसले होते. त्यांचे नाव संजय राऊत. त्यांना मी सांगून गेलो की हे सांगायला चाल्लो आहे. मी आलो त्यावेळी ते तिथेच होते. त्यामुळे मी त्यांच्या कानावरही घातलं,” असं पवार यांनी म्हटल्यानंतर राऊत यांनी हसून या वाक्याला दाद दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 9:12 am

Web Title: i went to pm modi s chamber in parliament and told him we cant form government with bjp in maharashtra says sharad pawar scsg 91
Next Stories
1 …म्हणून आम्ही २०१४ साली भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला : शरद पवार
2 “मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस लोकांना माहित झाले”; ‘त्या’ प्रश्नावरुन पवारांचा टोला
3 Video: एक शरद, सगळे गारद…!; येथे पाहा मुलाखतीचा शेवटचा भाग
Just Now!
X