माणगाव तहसीलदारांवर रेती माफियांकडून झालेल्या हल्ल्याची रायगड पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. अवैध रेती वाहतुकीविरोधात व्यापक कारवाईला सुरुवात केली असून आता रेतीची तस्करी करणाऱ्या वाहनांचे तसेच वाहनचालकांचे परवाने रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आजवर केवळ दंडात्मक कारवाई केली जात होती. त्याचे भय रेती माफियांना नव्हते. त्यामुळे आता अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने (रजिस्ट्रेशन) रद्द करण्याचा निर्णय रायगड पोलिसांनी घेतला आहे. सध्या जिल्ह्य़ातील सर्व २८ पोलीस ठाण्यांकडून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. ही माहिती संकलित करून सर्व वाहनांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर केले जाणार आहेत. वाहन परवाना रद्द करण्याबरोबरच या वाहनांवरील चालकांचे वाहतूक परवाने (लायसन्स)देखील रद्द केले जाणार आहे. त्यामुळे अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीला मोठा आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
संक्शन पंपाने वाळू उत्खननावर बंदी असताना रायगड जिल्ह्य़ात राजरोसपणे बेकायदा वाळू उत्खनन केले जाते. यावर प्रतिबंध आणण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा तोकडी पडते. त्यातच महसूल विभाग आणि पोलीस खात्यात समन्वयाचा अभाव आहे. त्यातून अनेकदा अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडतात. गेल्या सहा महिन्यांत वाळू माफियांकडून हल्ल्याचे तीन प्रकार घडले. हे प्रकार रोखण्यासाठी यापुढे पोलीस आणि महसूल विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी दिले होते. यानुसार आता वाळू तस्करांची कोंडी करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्य़ात अवैध वाळू उत्खननाची एकूण ११३ प्रकरणे दाखल झाली, त्यापकी १०६ प्रकरणांत ४५ लाख २३ हजार १०५ रुपये दंड आकारण्यात आला. तर अवैध वाळू वाहतुकीच्या ७४ प्रकरणांत ९ फौजदारी गुन्हे दाखल करून २४ जणांना अटक करण्यात आली. यात १५ लाख ५२ हजार १४७ रुपये इतकी दंडवसुली करण्यात आली, मात्र तरीही अवैध वाळूची वाहतूक रोखण्यात यश येत नव्हते. त्यामुळे आता अवैध वाळूची वाहतूक करणारी वाहने आणि ती वाहने चालवणारे चालक यांचे परवानेच रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून आरटीओला पाठविण्यात येणार असल्याचे रायगडचे वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी सांगितले.