कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात असलेल्या गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील मुलगा, त्याचे आई-वडील आणि एका महिलेचा समावेश आहे. सिंधू जालिंदर गायकवाड (वय ६२), संतोष जालिंदर गायकवाड (वय ४०), जालिंदर बाळू गायकवाड (वय ६८), इंदूबाई भिकाजी भोसले (वय ६५) अशी या चौघांची नावे आहेत.

पीडित मुलगी अल्पवयीन असून ती पालकांसोबत कासारपुतळे गावात राहत होती. आई रागावल्यामुळे १० नोव्हेंबर २०१४ रोजी मुलगी घरातून निघून गेली. १२ नोव्हेंबर रोजी ती आदमापूर (ता. भूदरगड) येथे संत बाळू मामा मंदिराच्या बाहेर बसली होती. त्यावेळी दर्शनासाठी आलेल्या जालिंदर गायकवाड व सिंधू गायकवाड यांनी तिला सांभाळतो असे सांगून आपल्या गावी आंबळे येथे नेले.

संतोष गायकवाड याच्याबरोबर अल्पवयीन मुलीचे लग्न करून देण्याचा त्यांचा विचार होता. मात्र गावातील लोकांना याबाबत संशय येईल म्हणून गायकवाड दाम्पत्याने मुलगा संतोष व अल्पवयीन मुलीस मांडर (ता. पुरंदर) येथील नातेवाईक महिला इंदूबाई भोसले यांच्याकडे पाठवून दिले. १३ नोव्हेंबर रोजी रात्री संतोष गायकवाड याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. संतोष व इंदूबाई भोसले पिडीत मुलीस विकण्याची भाषा करीत होते,त्यामुळे त्यांचा संशय आल्यामुळे पीडित मुलीने संतोषच्या मोबाईलवरून गुपचूप आपल्या गावी फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली.

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पीडित मुलीची सुटका केली. त्यानंतर या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य धरून कलम ३७६, ३६६ (अ),३६८ व बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४, सह ३४ अन्वये दोषी ठरलेल्या आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली