04 March 2021

News Flash

‘जलयुक्त शिवार योजना म्हणजे क्रिकेटची ‘ट्वेंटी ट्वेंटी’ मॅच’!

राज्यातील जलयुक्त शिवार कार्यक्रम ज्या पद्धतीने सुरूआहे, तोसुद्धा एकप्रकारे ट्वेंटी-ट्वेंटी सामना असल्याची टीका हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केली.

| March 17, 2015 01:53 am

क्रिकेटमध्ये ट्वेंटी-ट्वेंटी म्हणजे नुसतीच करमणूक. राज्यातील जलयुक्त शिवार कार्यक्रम ज्या पद्धतीने सुरूआहे, तोसुद्धा एकप्रकारे ट्वेंटी-ट्वेंटी सामना असल्याची टीका हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केली. दुष्काळाच्या मोठय़ा संकटातही तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असतील, तर ती बाब राज्यासाठी चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. ‘माथा ते पायथा’ अशी कामे न करता केले जाणारे नाल्याचे सरळीकरण उपयोगाचे नसल्याची भूमिका त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली. तांत्रिक पातळीवरच घेतल्या जाणाऱ्या या आक्षेपामुळे या योजनेवर नव्याने प्रश्न लावले जात आहेत.
दुष्काळाच्या प्रश्नावरील जालिम इलाज म्हणून जलयुक्त शिवार योजनेचा गवगवा केला जात आहे. मुळात जलसंधारणाचा आत्मा हा वनसंवर्धन व मृदसंधारण असा आहे. ‘माथा ते पायथा’ अशी कामे केली जाणार नाहीत, तोपर्यंत पावसाचे पाणी जमिनीत मुरणार नाही. उलट पावसाच्या प्रवाहामुळे माती वाहून जाण्याचा धोका जलयुक्त शिवारामुळे झाला असल्याचे पवार यांनी सांगितले. या योजनेंतर्गत राज्यात सर्वत्र नाला सरळीकरणाचे काम हाती घेतले जात आहे. प्रत्येक गावात ओढय़ालगत २० टक्क्य़ांपेक्षा कमी लोकांच्या जमिनी आहेत. उर्वरित ७५ ते ८० टक्के जमिनी माथ्यावर आहेत. नाला सरळीकरणाच्या कामातून अगोदर वाळू काढली जाते. यानंतर भूस्तरातील पाणी फिल्टर करण्याचे काम जो मुरमाचा थर करतो, तो काढून घेतला गेला तर जमिनीत पाणी मुरणे अवघड होते. जोपर्यंत माथा ते पायथा ही कामे केली जाणार, तोपर्यंत सरळीकरण केलेल्या ठिकाणी गाळ साचण्याची शक्यता अधिक असेल. नाही तर नाला सरळीकरण केलेल्या कामात जे पाणी थांबणार आहे त्यात गाळ साचेल. त्यामुळे हा भूस्तर कायमस्वरूपी मृत होईल.
पवार म्हणाले की, महाराष्ट्रभर ८० टक्के बेसॉल्ट खडक आहे. याची पाणी धारण करण्याची क्षमता केवळ साडेचार टक्के आहे व हेही थर पाणी अडवण्याच्या नावाखाली काढून टाकले तर पाणी फिल्टर कसे होईल? हिवरेबाजार येथे केवळ ३२५ मिमी पाऊस वर्षभरात पडून या उन्हाळय़ातही दोन किलोमीटर ओढय़ात पाणी वाहते आहे. ही काही जादू नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीने जलसंधारणाची कामे केल्यामुळेच आम्ही ते करू शकलो. नाला सरळीकरणाच्या कामातून पाणी थांबेल. मात्र, गावोगावी पुन्हा ओढय़ालगतचे व ओढय़ापासून दूर असणारे शेतकरी असे दोन गट पडतील. त्या गावाचा नकाशा काढून पाणी अडवण्यासाठी सर्व उपाय एकत्रित राबवायला हवेत. शेतात कंपार्टमेंट बंिडगचे काम हाती घेतले पाहिजे. हे केले तरच नाला सरळीकरण कामाचा उपयोग होईल, अन्यथा पुन्हा आलेली ही संधी आपण गमावून बसू. लोक पाणीप्रश्नामुळे अडचणीत आले आहेत. पाणीप्रश्नावर आता लोकसहभागही मोठय़ा प्रमाणात देण्यास तयार आहेत. याचा शास्त्रशुद्ध उपयोग करण्याची संधी वाया घालवता कामा नये, असे आपले मत असल्याचे पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 1:53 am

Web Title: jalyukta plan popatrao pawars criticism
Next Stories
1 ‘साहित्य संस्कृती मंडळ अस्तित्वहीन’
2 िहगोली बाजार समितीवर राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आघाडीचा झेंडा
3 नागपुरात गारपीट
Just Now!
X