राज्यातील ५० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. संजय शिंदे आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे यांनी निवेदनाव्दारे ही माहिती दिली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी याआधी २०१३ च्या बारावी परीक्षेवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पाच फेब्रुवारी रोजी संघटनेबरोबर झालेल्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री व शिक्षणमंत्री या दोघांनी सकारात्मक प्रतिसाद दाखविल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीने तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेपुरता बहिष्कार मागे घेतला. त्याच वेळेस उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागण्यांबाबत सन्मानजनक तोडगा न निघाल्यास कायम राहील, अशी भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यानच्या कालावधीत आजपर्यंत फक्त एकच बैठक झाली. या बैठकीतून काहीही निष्पन्न न झाल्याने काही कालावधीपुरता विद्यार्थी व पालक हितासाठी मागे घेतलेला बहिष्कार उद्यापासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर कायम करण्याचा निर्णय महासंघाच्या कार्यकारिणीने घेतला आहे.
बहिष्कार मागे घेतल्याबाबत कोणतेही पत्र शासनास दिलेले नाही किंवा प्रसिद्ध केलेले नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षकांनी सर्व  मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी उत्तरपत्रिका तपासणी कामावर एकजुटीने बहिष्कार टाकावा व शासनास त्वरित निर्णय घेण्यास भाग पाडावे असे आवाहन प्रा. संजय शिंदे यांसह नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे व उपाध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले आहे.