माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारवर निशाणा
मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारे खापर काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर फोडले असले तरी, दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात भाजप सरकारला अपयश आल्यानेच ते दडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला लक्ष्य केल्याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.
दुष्काळी भागाचा दौरा केल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच्या आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला. मराठवाडय़ाचे पाणी पळविल्याने या भागात पाणी नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दुष्काळी भागातील परिस्थिती चिंताजनक असताना अजूनही सरकारी मदत पोहचलेली नाही. चारा छावण्या नाहीत, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. यामुळेच मुख्यमंत्र्यांना मराठवाडा दौऱ्यात जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
दुष्काळी भागात सरकारचे अस्तित्वच जाणवत नाही. दोन वर्षांंपूर्वी राज्याच्या काही भागांत पडलेल्या दुष्काळाच्या वेळी सारी शासकीय यंत्रणा कामात गुंतली होती. परिणामी लोकांना दिलासा मिळाला होता, याकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष वेधले. सध्या शासनाकडून मदत मिळत नाही, अशा तक्रारी लोकांकडून येत आहेत. स्थलांतर सुरू झाले आहे. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात दीर्घ आणि तात्काळ अशा दोन पद्धतीने उपाय योजावे लागतात. दीर्घकालीन योजना राबविण्यात आमच्या सरकारच्या काळात निधीचा प्रश्न होता. मात्र, आमच्या काळात आंदेलने झाली नाही.