मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटात नव्या मार्गावर मोठा तडा गेला आहे. पाऊस थांबल्यानंतर दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग (एनएचआय) हाती घेणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
‘कोणत्याही नव्या रस्त्याची बांधणी झाल्यावर खालील भागात पाणी शिरल्याने सुरुवातीला अशा घटना घडत असतात. नवीन रस्ता पक्का होण्यास काही कालावधी लागत असतो,’ असेही ते म्हणाले. उपरोक्त मार्गावर एकेरी वाहतूक  सुरू आहे. दरम्यान, सलग दोन दिवसांपासून विस्कळीत झालेली नाशिक-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक आता सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे.
जिल्ह्य़ाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तयारीचा आढावा शुक्रवारी भुजबळ यांनी घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महामार्गावरील परिस्थितीची माहिती दिली. महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर कसारा घाटात येण्यास व जाण्यास स्वतंत्र मार्ग आहे.
नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर तडा जाण्याचा प्रकार घडला आहे. एनएचआय, टोल कंपनी व महामार्ग पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी लोखंडी जाळ्या उभारून वाहतूक बंद केली आहे.
रस्त्याचा हा तडा काही अंशी वाढल्याचे निरीक्षणही प्रत्यक्षदर्शीकडून नोंदविण्यात आले. दरम्यान, कसारा-इगतपुरी दरम्यान लोह मार्गावर दरड कोसळल्यामुळे दोन दिवस विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक तिसऱ्या दिवशी सुरळीत झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.