हमखास व्याघ्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबाच्या सभोवती वन्यजीवप्रेमी व निवृत्त वनाधिकाऱ्यांनी उभारलेल्या रिसोर्टची झालेली गर्दी व त्यांच्याकडून सातत्याने होणारे नियमांचे उल्लंघन, यामुळे या प्रकल्पातील वाघांची सुरक्षाच धोक्यात आली आहे. अधिकाऱ्यांशी उत्तम संबंध ठेवून असणाऱ्या या रिसोर्ट चालकांना अडवण्याची हिंमत कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा नाही अशी सध्याची अवस्था आहे.
वाघांची सर्वाधिक संख्या असलेला ताडोबा हा राज्यातला एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे येथे पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शन होते. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढू लागल्यानंतर त्यांच्या सोयीसाठी या प्रकल्पाच्या सभोवताल हॉटेल्स व रिसार्ट बांधण्याची जणू स्पर्धाच अलीकडच्या काही वर्षांत सुरू झाली. सध्याच्या घडीला हा संपूर्ण प्रकल्प या रिसॉर्टनी वेढलेला आहे. यापैकी बहुसंख्य रिसार्ट प्रशासकीय वर्तुळात वन्यजीव अभ्यासक म्हणून मिरवणाऱ्यांचे तसेच निवृत्त वनाधिकाऱ्यांचे आहेत. आजवर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वन्यजीवांची काळजी वाहणारे हे अभ्यासक आता चक्क धंद्यात उतरले आहेत. अधिकाऱ्यांची स्थिती सुद्धा तशीच आहे.
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरून निवृत्त झालेल्या वनसेवेतील दोन अधिकाऱ्यांचे रिसार्ट ताडोबाला अगदी खेटून आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही अधिकारी परप्रांतीय आहेत. या सर्वाचा आधीपासून वनखात्यात वावर असल्याने या महागडय़ा रिसार्टमध्ये थांबणाऱ्या पर्यटकांसाठी ताडोबातील नियम आपोआप शिथील होतात. ‘लोकसत्ता’त प्रकाशित झालेले छायाचित्र याच रिसोर्टमध्ये थांबणाऱ्या पर्यटकांचे आहे. व्याघ्र प्रकल्पात फिरणाऱ्या पर्यटकांसाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने नियम तयार केले आहेत. ‘प्रकल्पात फिरतांना वाहनांच्या खाली उतरू नये, वाघाचे दर्शन २० फूटांवरून घ्यावे, वन्यप्राण्यांच्या जवळ जाऊ नये, त्यांना घेरण्याचा प्रयत्न करू नये, हे प्राणी बिथरणारी कोणतीही कृती करू नये,’ यासह अनेक नियमांचा यात समावेश आहे. इतर पर्यटकांसाठी हे सारे नियम लागू असतात. त्यांच्याकडून उल्लंघन झाले तर दंड भरण्यासोबतच अधिकाऱ्यांच्या शिव्या सुद्धा पर्यटकांना खाव्या लागतात.
अधिकारी व अभ्यासकांच्या रिसोर्टमध्ये थांबणाऱ्या पर्यटकांना मात्र या नियमांतून सूट दिली आहे. प्रवेशाच्या वेळेचे बंधन वगळता या पर्यटकांना इतरांसाठी खुल्या नसलेल्या रस्त्यावरून सुद्धा फिरवण्यात येते. ताडोबात नव्याने खुला करण्यात आलेला कोसबा रस्ता त्याचे उत्तम उदाहरण आहे. या रिसोर्टमध्ये थांबणारे पर्यटकसुद्धा व्हीआयपी असतात. त्यातील बहुसंख्य विदेशी असतात. विदेशी नागरिकांसमोर लोटांगण घालण्याची भारतीयांची वृत्ती ताडोबात ठायी ठायी दिसून येते. त्यातूनच असे नियमभंगाचे प्रकार घडतात व छायाचित्रे जन्म घेतात. अधिकारी व अभ्यासकांच्या रिसार्टमध्ये थांबणाऱ्या पर्यटकांना अडवण्याची हिंमत येथील कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा नाही. अडवले तर साहेबांची कानउघडणी सहन करावी लागते. त्यामुळे कुणीही या खास पर्यटकांच्या वाटेला जात नाही.
व्हीआयपी कोटय़ाची किमया
या प्रकल्पातील वरिष्ठांना प्रवेशासाठी व्हीआयपी कोटा देण्यात आला आहे. त्याचा सर्रास दुरूपयोग होतो. मध्यंतरी एका अधिकाऱ्याने आपल्या सासू-सासऱ्यासह देशभरातील नातेवाईकांना या कोटय़ातून ताडोबात मुक्तपणे सैर करून आणले.