तुकाराम झाडे

सरकारी काम अन् सहा महिने थांब, असा अनुभव प्रशासनातीलच एक नायब तहसीलदार घेत आहे. औंढा नागनाथ येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव हे गेल्या चार वर्षांंपासून महसूलच्या ज्या निवासस्थानात राहतात त्याची एवढी दुरवस्था झालेली आहे की पाऊस सुरू झाल्यानंतर तेथील कुटुंबाला मुक्काम हलवून थेट तहसील कार्यालयात जाऊन रात्र काढावी लागते. घराची दुरुस्ती करून मिळावी, यासाठी वारंवार अर्ज करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही.

औंढा नागनाथ महसूल कर्मचाऱ्यांसाठी तहसील कार्यालयाच्या मागे निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. गेल्या चार वर्षांंपासून नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेले वैजनाथ भालेरावही महसूलकडून मिळालेल्या त्या निवासस्थानात राहतात. मात्र ते निवासस्थान अत्यंत मोडकळीस आले आहे. खिडक्या आहेत तर त्याला काच, दरवाजे नाहीत, निवासस्थानात चार खोल्या आहेत. त्यातील काही खोल्यांचे छत ढासळले आहे. पावसाळ्यात झड असली की स्वतच्या बचावासाठी त्यांना रात्र जागून काढावी लागते. अथवा तहसील कार्यालयात कुटुंबासह जाऊन रात्र काढावी लागते.

या निवासस्थानाची दुरुस्ती व्हावी म्हणून त्यांनी तहसीलमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला चार वेळा लेखी पत्र दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी येतात, दुरुस्तीच्या कामाचे सर्वेक्षण करतात. मात्र काम सुरू होण्यापूर्वी पावसाळा संपतो आणि पावसाळा आला की भालेराव यांच्यासमोर त्याच समस्या उभ्या ठाकतात.

गेल्या तीन-चार दिवसांपासून औंढा नागनाथ येथे रिमझिम पावसाची झड सुरू आहे. निवासस्थानातील चारही खोल्या पावसाच्या झडीत गळत असल्याने तहसीलदार त्रस्त झाले आहेत. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे पावसाची झड लागली म्हणजे त्यांना आपल्या कुटुंबासह तहसील कार्यालयात रात्र काढण्याची वेळ सात ते आठ वेळा आल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निवासस्थान दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार सर्वेक्षण होऊनही दुरुस्तीचे काम का होत नाही, असा प्रश्न मलाच पडला असल्याचे भालेराव म्हणाले.

चार वेळा सर्वेक्षण होऊन दुरुस्ती नाही

औंढा नागनाथ येथील महसूलच्या मोडकळीस आलेल्या निवासस्थानासंदर्भात वैजनाथ भालेराव यांनी सांगितले की, माझे निवासस्थान दुरुस्त करण्याच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चार वेळा सर्वेक्षण केले. मात्र या चार वर्षांत त्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामागे नेमके काय दडले आहे , असा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. माझ्या निवासस्थानाच्या बाजूला एक मंडळाधिकारी व दुसरे तलाठी राहतात, त्या दोघांचीही निवासस्थाने दुरुस्तीला आलेली आहेत. परंतु माझ्या निवासस्थानाची व्यवस्था अत्यंत वाईट असल्याने झड लागली म्हणजे मला कुटुंबीयासह तहसील कार्यालयात रात्र काढावी लागते.