करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि गर्दीला आळा घालण्यासाठी ठाकरे सरकारने आज कठोर निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटी शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन, तर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउनबद्दलची सरकारची भूमिका मांडली. ‘इतके दिवस आपण सातत्याने सांगत होतो, प्रत्येकाने काळजी घ्या. नियमांचं पालन करा. कडक भूमिका घेण्याची वेळ येऊ देऊ नका,” असंही पवार यावेळी म्हणाले.

बैठकीनंतर बोलताना अजित पवार म्हणाले,”आधी करोना झाल्यानंतर त्या घरात आपण कुणीच तिथे फिरकायचो नाही. आता वर्ष दीड वर्षात करोना संकटाबद्दलची भीती लोकांच्या मनातून पूर्णपणे दूर झालेली आहे. त्यामुळे बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागत आहे. मागच्या वेळेपेक्षा यावेळी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज जास्त दिसतेय. मागच्या वेळी पॉझिटिव्ह रुग्ण जर पाच रुग्णांना बाधित करत असेल, तर यावेळी बाधित रुग्ण संपूर्ण परिवारालाच बाधित करत आहे. तो १५ ते २० जणांना बाधित करतोय. आता रुग्णांना पूर्वीसारखा त्रास जाणवत आहे. ऑक्सिजन बेडसाठी आपण खासगी रुग्णालयांची मदत घेत आहोत. वेगळ्या घटकांना मदत देण्याची मागणी होतेय. पण अनेक मागण्यां आणि राज्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन यासंदर्भातील निर्णय घेऊ,” असं अजित पवार म्हणाले.

यावेळी ‘पुणेकरांचा लॉकडाउनला विरोध आहे’ असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले,”एक मिनिटं… लॉकडाउनला पुणेकरांचा नाही, अख्ख्या महाराष्ट्राचाच विरोध आहे. हे आम्हालाही कळतं. आमचंही त्याबद्दल काही वेगळं मत आहे. वेगळं मत इतकं दिवस असलं, तरी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ लोकांनी ही जी संख्या रोज पाच टक्क्यांनी वाढत आहे. ती बघितल्यानंतर १५ एप्रिलपर्यंत काय परिस्थिती निर्माण होईल, हे केंद्राच्या टीमनंही सांगितलं आहे. ज्यांना या सगळ्या संकटांचा अनुभव आहे, त्यांना लोकांनी हे सांगितलं आहे. आम्हाला लॉकडाउन करायला फार समाधान वाटत नाही. पण इतके दिवस आपण सातत्याने सांगत आहोत. प्रत्येकाने काळजी घ्या. नियमांचं पालन करा. कडक भूमिका घेण्याची वेळ येऊ देऊ नका. मागच्या वेळी पोलिसांनी वेगळ्या प्रकारे ही परिस्थिती हाताळली होती. काही लोकं घाबरून गेली होती. पहिल्या लाटेत लोकांच्या मनात करोनाची भीती असल्यानं लॉकडाउन पालन तंतोतंत केलं. पण आज तसं नाही. आज रविवार होता. तुम्हाला कुणी सांगितलं होतं का मीटिंग आहे म्हणून तरी सुद्धा तुम्ही आलातच ना? अशा पद्धतीनेच लोक जमत आहेत,” असं म्हणत अजित पवार यांनी लॉकडाउनच्या निर्णयाबद्दल भूमिका मांडली.