अलिबाग : सुनील तटकरेंना अलिबागमध्ये पाय ठेऊ देणार नाही, त्यांचा राजकीय बदला घेतल्या शिवाय राहणार नाही, असा आवाज काही वर्षांपुर्वीच काँग्रेसचे माजी आमदार मधूकर ठाकूर यांनी टाकला होता. गुरुवारी मात्र सुनील तटकरे यांनी याच मधुकर ठाकूरांच्या घरी जाऊन दोन तास चर्चा केली. बंद दरवाज्यांच्या आड झालेल्या या चच्रेचा तपशील कळू शकला नसला तरी मधुकर ठाकूर यांनी तटकरेंच्या विरोधात उपसलेली तलवार म्यान केल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

गेल्या लोकसभा निवडणूकीत माझी आमदार मधुकर ठाकूर यांनी तटकरे यांच्या प्रचाराची धुरा संभाळली होती. त्यामुळे तटकरेंना अलिबाग मधून चांगले मताधिक्य मिळाले होते. या मदतीची परतफेड विधानसभा निवडणूकीत करीन असा शब्द तटकरे यांनी ठाकूरांना दिला होता. मात्र लोकसभेनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आघाडी तुटली. त्यामुळे तटकरेंनी ठाकूर यांना दिलेला शब्द पाळला नाही. यामुळे विधानसभा निवडणूकीत मधुकर ठाकूर यांचा दारूण पराभव झाला. या पराभवामुळे खचलेल्या ठाकूर यांनी तटकरेंविरोधात आवाज टाकला. तटकरेनी विश्वासघात केल्याचा आरोप करत त्यांना अलिबाग मध्ये फिरकू देणार नाही अशी प्रतिज्ञा केली. या ठाकूर यांच्या कडवट भुमिकेमुळे तटकरेंना काही काळ अलिबाग पासून लांब रहावे लागले होते. पक्षाच्या वतीने अलिबाग येथे आयोजित कार्यक्रम रद्द करावे लागले होते.

बेलोशी येथे गेल्या वर्षी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात मधुकर ठाकूर यांनी तटकरेंचा राजकीय बदला घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी आदिती तटकरे या देखील तिथे उपस्थित होत्या. राज्यात जरी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी झाली तरी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात अशी आघाडी होणार नाही. सुनील तटकरे यांनी सलग तीन वेळा आमची फसवणुक केली आहे. याचा राजकीय बदला घेतल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही, मग पक्षाने कारवाई केली तरी चालेल असा शाब्दीक हल्ला माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी चढवला.त्यामुळे लोकसभा निवडणूकीत मदत तटकरेंना कितपत मदत करतील याबाबत साशंकता होती.

पण राजकारणात कधी कोण कोणाचा शत्रु नसतो म्हणतात. याचाच प्रत्यय गुरुवारी आला. सुनील तटकरे धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून अलिबाग मध्ये दाखल झाले. त्यांनी थेट मधुकर ठाकूर यांचे घर गाठले. दोघांमध्ये तब्बल दोन तास बंद दरवाजाच्या आड चर्चा झाली. माध्यमांच्या प्रतिनिधींना यावेळी प्रवेशही नाकारण्यात आला. तर बठकीचा तपशील दोन दिवसांनी जाहीर करू असे सांगण्यात आले. एकूणच मधुकर ठाकूर यांनी तटकरे विरोधात उपसलेली तलवार म्यान केल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. काँग्रेस मधील काही वरीष्ठ नेते यासाठी प्रयत्नशील आहेत. याभेटीमुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेसनी शिवसेनेशी जुळवून घेण्याचे धोरण अवलंबिले होते. यामुळे अनेक ग्रामपंचायतीवर सत्ता काबिज करण्यात काँग्रेस आणि शिवसेनेला यश आले होते. आता ठाकूर यांनी शेकाप आणि राष्ट्रवादीशी तहाची बोलणी सुरु केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

‘लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभुमीवर अलिबाग काँग्रेस कमिटीची एक विशेष सभा काँग्रेस भुवन येथे बोलविण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने आघाडीचा धर्म पाळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणूकीत तटकरेंना मदत करण्याबाबत या बठकीत अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे.’