11 December 2017

News Flash

सावकारी व्यवसायातून १३ लाखांचे दागिने हडप

रेवदंडय़ातील बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी, अलिबाग | Updated: March 21, 2017 1:37 AM

रेवदंडय़ातील बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल

गहाण ठेवलेले सुमारे १३ लाख रुपयांचे दागिने हडप करणारा अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील जयंतीलाल जैन ऊर्फ काळा मारवाडी यांच्याविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ात जयंतीलाल याची दोन मुले खेमराज व सचिन यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

रेवदंडा येथील सचिन मयेकर याने याबाबतची फिर्याद दिली आहे. जयंतीलाल जैन हे रेवदंडा येथे अनेक वष्रे सावकारी व्यवसाय करतात. त्यांच्याकडे या व्यवसायाचा परवानादेखील आहे. मात्र या परवान्याचा गरवापर करीत आपली फसवणूक करण्यात आली असल्याची सचिन मयेकर यांची तक्रार आहे. सचिन यांनी जयंतीलाल जैन यांच्याकडे आपले सोन्याचे १२ लाख ७६ हजार ८२५ रुपयांचे दागिने गहाण ठेवून ८ लाख ९५ हजार रुपये इतके कर्ज घेतले होते. ते या रकमेचे अधूनमधून व्याज भरत असत. परंतु याबाबतची कोणतीही पावती सावकाराने सचिन यांना दिली नाही. गहाण टाकलेले दागिने सोडवण्यासाठी ते गेले असता त्यांनी कर्ज घेतलेल्या रकमेवर व्याज जमा करून त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याजआकारणी केली.

व्याजाच्या रकमेची माहिती लेखी मागितली असता ती देण्यास नकार दिला. उलट ते दागिने मोडून टाकतो व उर्वरित रक्कम तुला भरावी लागेल, असे बजावले. तसेच दागिने परत करण्यास नकार दिला.यासंदर्भात मयेकर यांनी दुय्यम निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार केली.

त्यांनी केलेल्या चौकशीअंती आपण गहाण ठेवलेल्या कोणत्याही दागिन्यांची नोंद जयंतीलाल यांच्याकडे नसल्याचे या कार्यालयाने आपल्याला सांगितले असल्याचे सचिन मयेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

यासंदर्भात रेवदंडा पोलिसांनी सचिन यांच्या फिर्यादीवरून जयंतीलाल जैन, त्यांचा मुलगा सचिन जैन व खेमराज जैन यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियम) अध्यादेश कलम ४३ तसेच भा. दं. वि. कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

 

First Published on March 21, 2017 1:37 am

Web Title: loksatta crime news 16