मालवणी बोलीभाषेचा गोडवा वाढावा म्हणून जिल्हास्तरीय मच्छिंद्र करंडक मालवणी एकांकिका स्पर्धेचे आयोजन २० ते २२ मे या कालावधीत करण्याचे येथे जाहीर करण्यात आले.

सावंतवाडी नगरपालिका, नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने ओंकार कलामंच सावंतवाडी या संस्थेच्या आयोजनातून हा मालवणी महोत्सव होणार आहे. त्यासाठी तिन्ही संस्थांचे संयुक्त सहकार्य असेल, असे ओंकार कला मंचचे अमोल टेंबकर यांनी जाहीर केले. या वेळी प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर, नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे युवा उद्योजक विक्रांत सावंत, निरंजन सावंत आदी उपस्थित होते. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली. शिवराळ, पण तेवढीच गोडी या भाषेत आहे. त्यामुळे मालवणी भाषा बोलणारा माणूस पटकन ओळखू शकतो, असा एक दर्जा मच्छिंद्र कांबळी यांनी या भाषेला मिळवून दिला होता. या भाषेची गोडी आणखी वृद्धिंगत करून मालवणी भाषेची चळवळ पुन्हा एकदा जोमाने उभी राहण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे, असे अमोल टेंबकर म्हणाले.

मच्छिंद्र करंडक जिल्हास्तरीय महोत्सव आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात घेण्याची प्राथमिक चर्चा झाली. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांना मालवणीतच एकांकिका सादर करावी लागेल. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी लेखकाच्या पूर्वपरवानगीसहित आपला प्रवेश अर्ज माहितीसह १० मेपर्यंत आयोजकांकडे द्यावा. संघाची निवड पात्रता फेरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे अमोल टेंबकर म्हणाले.

अधिक माहितीसाठी मिलिंद कासार- ९४०५२२००७७, निरंजन सावंत- ९४०४९३१८०१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.