महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल बिलकूल चिंता करू नका. महाविकास आघाडीच्या बरोबरीने महाराष्ट्राचं भवितव्यही उज्ज्वल आहे असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

सत्तेमध्ये एकत्र आहात. सत्तेसाठी एकत्र राहाल…पण ही महाविकास आघाडी भविष्यातसुद्धा पुढे जाईल का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “जायला काय हरकत आहे? आणि न जावं असं कारण काय? जर तिघांनी एकमेकांच्या मर्यादा ओळखल्या असतील आणि तशा त्या ओळखल्या आहेतच, तर आपल्या मर्यादेमध्ये जास्तीत जास्त टप्पा किंवा दरमजल सहज साध्य करू शकतो. पण एखादा आपल्या आवाक्याच्या बाहेरचं काही करायला गेला तर तो आपटतो…”

सरकार चालवताना आसपास ‘मानवी बॉम्ब’ आपल्याला दिसताहेत का? या प्रश्नावर अजिबात नाहीयेत…कारण आता त्या तथाकथित मानवी बॉम्बच्या वाती विझून तिकडे आता नाती निर्माण झाली आहेत असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

आणखी वाचा – शरद पवारांकडे सरकारचा रिमोट कंट्रोल नाही – उद्धव ठाकरे

शरद पवारांबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?

या सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ दुसऱ्या कोणाकडे आहे का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “रिमोट कंट्रोल वगैरे असा काही प्रश्न नाहीये. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. आणि हो, तुमच्या प्रश्नाचा रोख मला कळला… तुम्हाला शरद पवारांविषयी विचारायचं आहे का? तर शरद पवारसुद्धा रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत… त्यांच्या काही सूचना असतील तर त्या जरूर करतात” असे उद्धव ठाकरे म्हणाले.