शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाली. जी कामं करायची ती आम्ही दिवसाढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही असंही यावेळी ते म्हणाले. प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने करोना होतो असं वाचलं असल्याचाही अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“मुंबईत जन्मलेली पहिली व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली हे मी माझं भाग्य समजतो. मुंबईकरांसाठी आपण अनेक गोष्टी आणणार असून जनसंपत्तीसह वनसंपत्तीही महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा-हास होता कामा नये. काम करताना कोणताही अहंकार असता कामा नये. त्याचप्रमाणे शॉर्टकटही मारु नये, अन्यथा रात्रीच्या अंधारात झाडे कापावी लागतात. अशाच अनेक गोष्टी कराव्या लागतात. रात्री चालणारी कामं आम्ही दिवसा करु लागलो असून जे करतो ते दिवसाढळ्या करतो,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

“आरे कारशेडसंबंधी आम्ही तज्ञांशी चर्चा करुन निर्णय घेत आहोत. जो खर्च झाला आहे तो वाया न जाता मेट्रोचा अधिक मुंबईकरांना लाभ घेता येत असेल तर त्यादृष्टीने पावलं टाकत आहोत,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वांना करोना संकटात सहकार्य करण्याची विनंती केली.

“करोना संकटात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या असून आपण आरोग्याकडे लक्ष देऊ लागलो आहोत. मुंबईसह जिथे गरज असेल तिथे सगळीकडे संसर्गजन्य आजार केंद्र निर्माण कऱण्याचा निर्णय घेण्यात आला,” असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. “सर्व गोष्टी सुरु करताना जनतेला करोनासोबत कसं जगायचं हे शिकवण्याची गरज आहे. करोना संकट शेवटचं असेल असं नाही. ते कदाचित पुढच्या संकटाची नांदीही असू शकते,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

आगामी काळात महाराष्ट्रात एक कार्यक्रम राबवण्याची इच्छा व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी सहकार्य करण्याची विनंती केली. प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली तर यंत्रणेवरील ताण कमी होईल असं सांगताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात जनतेच्या जनजागृतीसाठी माझे कुटुंब,माझी जबाबदारी” योजना जाहीर केली. “दोन टप्प्यात ही योजना राबवली जाणार असून प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी होणार आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.  ७ डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे.