निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुकद्वारे संबोधित केलं. तसंच या काळात कोणती काळची घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलं. सध्या राज्यात करोनाचं संकट उभं ठाकलं आहे. त्यातच निसर्ग हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. निसर्ग आपली परीक्षा घेणं सोडत नाहीये, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

पुढचे दोन दिवस पुनःश्च हरिओम नको असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित सांभाळून ठेवा असंही ते म्हणाले. १०० ते १२५ किमीच्या वेगाने सोसाट्याचा वारा आणि पाऊस असं येणार आहे. त्यामुळे काळजी घ्या, प्रशासन तुमच्यासोबत आहेच असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

वादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलं आहे. अलिबागजवळ हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ कदाचित हल्ली काही दिवसांमध्ये झालेल्या वादळांपेक्षा मोठं चक्रीवादळ आहे. प्रार्थना हीच आहे की हे वादळ हवेत विरुन जावं. प्रार्थनेला यश नक्कीच मिळेल असा विश्वास वाटतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण सज्ज आहोतच. NDRF च्या १५ तुकड्या आहेत. तसेच नौदल, हवाईदल, लष्कर आणि हवामान विभाग या सगळ्यांमध्येही समन्वय आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. करोनाचं संकट आपण जसं थोपवून धरलं आहे आणि ते परतवून लावणार आहोत तसंच हे वादळाचं संकट आपण परतवून लावू असंही ते म्हणाले.
केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे जी काही मदत लागेल ती सांगा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसंच सोमवारी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही यासंदर्भात आपल्याला पूर्ण पाठिंबा देणार आहोत असं सांगितलं आहे.

हे करू नका

१)
अफवा पसरवू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका

२)
चक्रीवादळाच्या दरम्यान गाडी किंवा दुचाकी वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न करुन नका.

३)
नुकसान झालेल्या इमारतींपासून दूर राहा

४)
अधिक इजेचा प्रत्यक्ष धोका असल्याशिवाय गंभीर जखमींना हलवण्याचा प्रयत्न करुन नका. त्यामुळे त्यांना अधिक इजा होऊ शकते.

५)
सांडलेली औषधे, तेल व इतर ज्वालाग्राही पदार्थ पसरु देऊ नका, त्यांना ताबडतोब स्वच्छ करा.