News Flash

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राची घसरण

अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये देशात कर्नाटक, तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो.

(संग्रहित छायाचित्र)

घनकचऱ्यापासून वीज निर्माण करण्याबाबत अनुत्साह

देशात आपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राची तिसऱ्या क्रमाकांवर घसरण झाली असली तरी राज्याने एकूण ९ हजार ३०० मेगावॅट इतकी वीज निर्मितीची क्षमता गाठली आहे. पाच वर्र्षांपुर्वी अक्षय ऊर्जा निर्मिती केवळ ५ हजार १७२ मेगावॅट होती. ती दुपटीहून वाढली आहे. मात्र  शहरी घनकचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र अजूनही चाचपडतच आहे.

अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये देशात कर्नाटक, तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. आधी महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी होते. राज्याची अक्षय ऊर्जा निर्मितीची संभाव्य क्षमता ७४ हजार ५०० मेगावॅटपर्यंत आहे. पूर्ण क्षमता गाठण्यासाठी अजूनही बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. पवनऊर्जा, सौर ऊर्जा, लघु जलविद्युत आणि सहवीजनिर्मिती या क्षेत्रात राज्याने गेल्या काही वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. अपारंपारिक वीज निर्मिती प्रकल्पांची आस्थापित क्षमता वाढत असतानाच लघु जलविद्युत प्रकल्पांकडे मात्र फारसे लक्ष दिले गेलेले नाही. राज्याची लघु जलविद्युत प्रकल्पांमधून वीज निर्मितीची क्षमता ७९४ मेगावॅटची असताना आतापर्यंत ३७५ मेगावॅट क्षमतेचेच लघु जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होऊ शकले आहेत. राज्यात शहरी घनकचऱ्यापासून देखील ऊर्जानिर्मितीसाठी मोठा वाव आहे. कचऱ्याचा उपयोग करून राज्यात २८७ मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जाऊ शकते, पण केवळ ३७ मेगावॅट क्षमतेचेच प्रकल्प उभारले गेले आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

भारताची नूतनशील ऊर्जा निर्मितीची संभाव्य क्षमता ८ लाख ९६ हजार ६०२ मेगावॅट आहे. राज्यात २००४ मध्ये तर केवळ ७४८ मेगावॅट इतकी वीज निर्मिती अक्षय ऊर्जेतून केली जात होती. पवन ऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी राज्यात ४० ठिकाणे उपयुक्त आहेत. या ऊर्जेपासून ५ हजार ९६१ मेगावॅट वीज निर्मितीस वाव आहे. आतापर्यंत राज्यात ४ हजार ७८८ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प २३ ठिकाणी उभारण्यात आले आहेत. खासगी गुंतवणूकदारांनी सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.अजूनही एवढय़ाच गुंतवणुकीची गरज आहे. साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपानंतर उपलब्ध होणाऱ्या ऊसाच्या चिपाडापासून वीज निर्मिती केली जाते. या सहवीज प्रकल्पांची राज्याची वीज निर्मितीची क्षमता सुमारे १२५० मेगावॅट असताना आतापर्यंत १९५३ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात यश आले आहे.

सौर ऊर्जेतही पिछाडी

सौर ऊर्जा प्रकल्पांच्या बाबतीतही महाराष्ट्र पिछाडीवर आहे. राज्यात सौर ऊर्जा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. सौर फोटोव्होल्टाईक आणि सौर औष्णिक तंत्रज्ञानाच्या आधारे वीज निर्मिती करता येऊ शकते. आतापर्यंत ग्रीड कनेक्टेड सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून १६०७ मेगावॅटचे वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. सौर ऊर्जेची संभाव्य क्षमता ही राज्यात ६४ हजार ३२० मेगावॅटची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 1:17 am

Web Title: maharashtra slips in renewable energy production
Next Stories
1 पाण्यासाठी कोरड्या नदीपात्रातील खड्ड्यांचा आधार
2 उस्मानाबाद : नळदुर्ग किल्ल्यात बोट उलटून तीन बालकांचा मृत्यू
3 राज्यातील २७ तंत्रनिकेतन संस्थांना टाळे लागणार?
Just Now!
X