News Flash

Lokckdown: महावितरणचा ‘या’ ग्राहकांना दिलासा; बिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित

लॉकडाउननंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने राज्यात ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. त्यामुळे या बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार/मागणी आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर येथे दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार/मागणी आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती, ही मागणी ग्राह्य धरून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या ग्राहकांना मोठा दिलासा दिला. एएमआरमार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध असल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे २०२० मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल.

लॉकडाऊनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीज वापर झाला नसल्याचे समजून लॉकडाऊनच्या कालावधीतील शून्य वापराचे वीजबिल देण्यात येणार असल्याचे सांगून राऊत म्हणाले, अशा ग्राहकांचे मीटर रीडिंग मिळाल्यानंतर या ग्राहकांना लॉकडाऊनच्या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल. तसेच लोड फॅक्टर/पीएफ सारखे सर्व प्रोत्साहन/सवलती उपलब्ध असतील.
मार्च महिन्याच्या वीज वापराच्या बिलाचे देयक १५ मे असणार आहे. तर एप्रिल महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक ३१ मे राहील. या दोन्ही महिन्यांच्या बिलावर नियमाप्रमाणे अनुदान लागू असेल, असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सेल्फ रिडिंग घेऊन वीजबीर भरता येणार

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मीटर वाचन होणार नाही. बिलिंग सरासरी मासिक वापरावर राहणार असून ग्राहकांना वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे सेल्फ रीडिंग (स्वत: घेतलेले) घेऊन वीजबिल भरता येईल. ज्या ग्राहकांनी स्वत:हून मीटर रीडिंग सादर केले आहे. त्या ग्राहकांना सरासरीनुसार वीज आकारणी केली जाणार आहे. पुढील काळात ज्यावेळी मीटर रीडिंग घेतले जाईल, त्यावेळी ग्राहकांना त्या महिन्यांचे सरासरी बिल आकारले जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

डिजिटल पेमेंटवर सवलती लागू

तात्काळ वीजबिल भरणा, गो-ग्रीन सवलत, डिजिटल पेमेंटबाबतच्या सवलती ग्राहकांना नियमाप्रमाणे लागू असून मार्च महिन्याचे बिल भरण्यास १५ मे २०२० पर्यंत सवलत देण्यात आली आहे. तर एप्रिल २०२०चे वीजबिल भरण्यासाठी ३१ मे २०२० ही अंतिम तारीख दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 7:29 pm

Web Title: mahavitaran gives comfort to industrial costumers fixed bill stop for 3 months aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्य सरकारचा निर्णय : नववी आणि ११वी च्या परीक्षा रद्द, दहावीच्या भूगोल, कार्यशिक्षणचेही पेपर रद्द
2 पाटील Vs पाटील : चंद्रकांत दादा, साठीच्या वरील लोकांना करोनाचा धोका -जयंत पाटील
3 उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद : मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले १९७ कोटी रुपये
Just Now!
X