वर्धा : सेवाग्राम आश्रमातून महात्मा गांधी यांचा चष्मा चोरीस गेल्याच्या प्रकरणातील आरोपी कुणाल रामभाऊ वैद्य याची वर्धेच्या मुख्य न्याय दंडाधिकारी ए.ए. अयाचित यांनी निर्दोष सुटका केली.

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे तत्कालीन अध्यक्ष मा.म. गडकरी यांनी १३ जून २०११ रोजी या प्रकरणात सेवाग्राम पोलिसांकडे तक्रार दिली होती.

१९४६ला महात्मा गांधीजी सेवाग्राम आश्रम सोडून दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांच्या नित्य उपोयागातील वस्तू आश्रमात जपून ठेवण्यात आल्या होत्या. त्यात चष्म्याचा सुद्धा समावेश होता. मात्र, २० नोव्हेंबर २०१० रोजी हा चष्मा जागेवर नसल्याचे दिसून आले. अज्ञात मुलांनी बापूकुटीतील काचेच्या कपाटातून (शोकेस) चष्मा चोरल्याचा संशय व्यक्त झाला. याप्रकरणी बरीच शोधाशोध आश्रमवासीयांनी केली. शेवटी संचालक मंडळाने सभा घेऊन पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. सेवाग्राम पोलिसांकडून हा तपास शेवटी सीआयडीकडे सोपवण्यात आला. तपास पथकाने स्थानिक हिंदनगरातील कुणाल वैद्य यास अटक केली. त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.  या प्रकरणात २० पेक्षा अधिक साक्षीदार तपासण्यात आले.

चोरी गेलेला चष्मा हस्तगत न झाल्याची बाब यात महत्त्वपूर्ण ठरली. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला निर्दोष मुक्त केले. आरोपीतर्फे  अ‍ॅड. रोशन राठी यांनी बाजू मांडली.