मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टी चांगलीच सक्रिय आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी मात्र पक्षाची ही कृती समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राजकीय रंग देत असल्याची टीका केली आहे. मराठा क्रांती मोर्चाने भाजपाला केंद्र सरकारकडे आरक्षणाची मागणी लावून धरण्याची तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केंद्राला लढा देण्याची मागणी करावी अशी विनंती केली आहे.

भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जरुर या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, त्यांचं स्वागत आहे. मात्र, त्यांनी वैयक्तिकरित्या यावं, पक्ष म्हणून येऊ नये. भाजपाने समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाला राजकीय रंग देऊ नये, असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- मराठा आरक्षणप्रकरणी भाजपचे राजकारण

दोन दिवसांपूर्वीच पुण्याचे भाजपाचे अध्यक्ष जगदीश मुळीक आणि पिंपरी चिंचवडचे भाजपाध्यक्ष महेश लांडगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातली पक्षाची भूमिका मांडली. दोघांनीही सांगितलं की भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आंदोलनातल्या सर्वांच्या पाठीशी आहेत तसंच सोबत आहेत. आणि ते स्वतः निष्कर्ष निघेपर्यंत या आंदोलनामध्ये सहभागी असतील. ते म्हणाले की, राज्याने मराठा समाजासोबत न्याय केला नाही त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते आणि नेतेही आता समाजासाठी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामध्ये आपल्या पक्षाच्या नावासह सहभागी होतील.

आणखी वाचा- मराठा आरक्षण आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

त्यावर प्रतिक्रिया देत विनोद पाटील यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.
विनोद पाटील म्हणाले की सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. न्यायालयाच्या या खंडपीठाने सांगितलं आहे की १०२व्या घटनादुरुस्तीनंतर एखाद्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करणं हे केंद्र सरकारच्या अधिकारांमध्ये येतं, राज्य सरकारला तो अधिकार नाही. मग आता जर केंद्र सरकारकडे हा विषय गेला आहे तर मग राज्याच्या भाजपा नेत्यांनी या विषयाचा पाठपुरावा करायला हवा. सध्या आंदोलनाचा काळ नाही, करोनाचा प्रादुर्भाव जीवघेणा आहे. त्यामुळे आता राजकीय मतभेद विसरुन एकत्र येण्याची ही वेळ आहे. भाजपाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

मराठा क्रांती मोर्चाचे अजून एक समन्वयक मारुती भापकर म्हणाले की, जर भाजपाला आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हायचं असेल त्यांनी राजकीयदृष्ट्याही हा विषय महत्त्वाचा मानला पाहिजे.

ते म्हणतात, “राजकीय पक्षांचं कधीच एकमत होत नाही. ते फक्त एकमेकांशी श्रेय़ घेण्यासाठी लढत असतात. त्यामुळे या आंदोलनाचं महत्त्व कमी होईल. आम्हाला आरक्षणाच्या या विषयाला कोणताही राजकीय रंग द्यायचा नाही. त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावं मात्र आपापले पक्ष बाजूला सारुन !”

हेही वाचा- ‘आरक्षणाच्या मर्यादेवर केंद्राकडून ठाम भूमिकेची अपेक्षा’