नोटिशीनंतर काही सहकारी दूध संघांचा प्रस्ताव; शेतकऱ्यांचा मात्र विरोध

शेतकऱ्यांना दूध खरेदीचा दर कमी दिला म्हणून दुग्धविकास विभागाने काही सहकारी दूध संघांना नोटिसा दिल्यानंतर ते खडबडून जागे झाले. आता कारवाईतून पळवाट शोधण्यासाठी एकरकमी पसे देण्याऐवजी उसाच्या दराप्रमाणे पहिली उचल २४ रुपये प्रति लिटरने व नंतर उर्वरित रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारने ३.५ फॅट (स्निग्धांश) व ८.५ एस.एन.एफ (स्निग्धांश वगळता अन्य घन घटक) असलेल्या दूधाला प्रति लिटर २७ रुपये दर शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. मात्र  विक्रीदरातदरात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक संघांनी २७ रुपयांपेक्षा कमी दराने दूध दर देण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे दुग्धविकास विभागाने कमी दर देणाऱ्या सहकारी दूध संघांना नोटिसा दिल्या होत्या. त्याची दखल तातडीने दूध संघाच्या  पदाधिकाऱ्यांनी घेतली.

इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध उत्पादक कल्याणकारी संघटना स्थापन करण्यात आली असून तिची नुकतीच नोंदणी करण्यात आली. या संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ हे आहेत. गुरुवारी कात्रज दूध संघात बठक घेण्यात आली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना २७  रुपये प्रति लिटर एकरकमी दर देण्याऐवजी पहिली उचल म्हणून २४ रुपये प्रति लिटर दर देऊन नंतर दिवाळीला नफा झाल्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देण्यात यावी, असे सोनाई दूधचे माने यांनी सुचविले. त्याला सर्वानी संमती दिली. ऊस दराच्या धर्तीवर दोन ते तीन हप्त्यांत दर देण्याची पद्धत सुरू करण्याचा विचार या बठकीत पुढे आला. तसेच सरकारी दर परवडत नसल्याने संघाचे अस्तित्व संपेल. त्याकरिता दूध उत्पादकांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली. दूध दराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना शिष्टमंडळ भेटणार असून तसा निर्णय बठकीत घेण्यात आला.

प्रस्तावावर नाराजी

दुधाला पहिली उचल व दुसरी उचल अशा हप्तेवारी पद्धतीने दर देण्याची पद्धत सुरू करण्याचा सहकारी संघांचा प्रयत्न आहे. मात्र त्याला शेतकरी विरोध करतील. दूध खरेदी व विक्री या व्यवस्थेतील मधल्या साखळ्यांना दिला जाणारा मोबदला व खर्च कमी केला तर २७ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दर देणे शक्य आहे असे स्वाभिमानी दूध उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी सांगितले.