मराठवाडय़ात अवकाळी पाऊस जोरदार बरसून गेला. मान्सूनचा पाऊस काही ठिकाणी बरसला आणि १७ तालुक्यांत पाऊस फारसा पडलाच नसल्याची आकडेवारी आहे. या तालुक्यांतील पेरण्या रखडल्या आहेत. अजूनही दुष्काळाचा भोवताल पुरता बदलला नाही. पेरण्या न करणारे शेतकरीच हुशार असे म्हणण्याची वेळ येते की काय, अशी स्थिती आहे. बीड जिल्हय़ातील शिरूर कासार व गेवराई तालुक्यांत सर्वात कमी म्हणजे २२.३३ व ३४.९० मिमी पाऊस नोंदवला गेला.
औरंगाबाद, हिंगोली व जालना या तीन जिल्हय़ांत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत बरा पाऊस असला, तरी या आठवडय़ात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड व परभणी या ४ जिल्हय़ांमध्ये अजूनही कमालीचा कोरडेपणा कायम आहे. औरंगाबाद व जालना जिल्हय़ांत तुलनेने चांगला पाऊस झाला. मृग नक्षत्रात सरासरी गाठण्याची गेल्या ४ वर्षांतील ही पहिलीच वेळ असल्याने समाधानाचे वातावरण आहे. या दोन्ही जिल्हय़ांतील डोंगराळी भागाने जणू हिरवा शालू नेसला आहे, असे चित्र असले, तरी पेरण्या झाल्यानंतर आवश्यक असणारा पाऊस न पडल्याने पीक करपून जाण्याची भीती कायम आहे. औरंगाबाद जिल्हय़ातील सोयगाव आणि पैठण तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस आहे. सोयगाव तालुक्यात तुलनेने अधिक पाऊस पडतो.
परभणी जिल्हय़ातील गंगाखेड, जिंतूर, सोनपेठ व मानवत तालुक्यांत सर्वात कमी पाऊस नोंदवला गेला. सोनपेठमध्ये आतापर्यंत ४७ मिमी, पाथरी ५०.३३ मिमी, मानवत ६८ मिमी एवढाच पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे या तालुक्यांत तुलनेने पेरणी झालीच नाही आणि ज्यांनी पेरणी केली त्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय उरला नाही. नांदेड जिल्हय़ातील देगलूर, धर्माबाद व बिलोली तालुक्यांत कमी पाऊस झाला. मात्र, सर्वच तालुक्यांत १०० मिमीहून अधिक पाऊस नोंदवला गेला. नेहमीचे दुष्काळी ओळखल्या जाणाऱ्या आष्टी व पाटोदा या तालुक्यांपैकी पाटोदा तालुक्यात तुलनेने कमी म्हणजे ६३ मिमी एवढाच पाऊस झाला. लातूर जिल्हय़ातही निलंगा, अहमदपूर, लातूर तालुक्यांत कमी पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्हय़ातही अशीच स्थिती आहे. परिणामी, केलेली पेरणी वाया जाण्याची शक्यता अधिक आहे. उस्मानाबाद तालुक्यात ५२.२५ मिमी, तर तुळजापूर व कळंब तालुक्यात ५० ते ६० मिमी पाऊस झाला.