News Flash

चार डॉक्टरांच्या राजीनाम्यांमुळे राजापूर तालुक्यात ‘वैद्यकीय आणीबाणी’

अपऱ्या मन्युष्यबळावर रूग्णालय चालवणे मला शक्य नाही.

चार डॉक्टरांच्या राजीनाम्यांमुळे राजापूर तालुक्यात ‘वैद्यकीय आणीबाणी’

राजापूर : तालुक्यातील ओणी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या ३० मे रोजी उद्घाटन केलेल्या करोना उपचार केंद्रातील चार कंत्राटी डॉक्टरांनी एकाच वेळी राजीनामे दिल्याने तेथे ‘वैद्यकीय आणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे.

याचबरोबर, मनुष्यबळाच्या या गंभीर टंचाईच्या परिस्थितीत काम करणे शक्य नसल्याने आपल्यावर सोपवलेल्या राजापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाच्या अतिरिक्त कार्यभारातून आपली मुक्तता करावी, अशी विनंती या रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

ओणी येथील करोना उपचार केंद्रातील चारपैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने यापूर्वीच राजीनामा दिला असून त्याला गेल्या बुधवारी कार्यमुक्त करण्यात आले आहे. उर्वरित तीन डॉक्टरांनीही सेवामुक्त होण्यासाठी दिलेल्या नोटिशीची मुदत येत्या १८ जुलै रोजी संपत असल्याने त्या दिवशी तेही बाहेर पडणार आहेत.

याशिवाय, राजापूर ग्रामीण रूग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ. जनन्नाथ गारूडी यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याने कार्यमुक्त करण्यात आले आहे, तर उर्वरित एक वैद्यकीय अधिकारी डॉ. बागचंद्र चौधरी हेसुध्दा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

अशा अपऱ्या मन्युष्यबळावर रूग्णालय चालवणे मला शक्य नाही. तरी माझ्यावर देण्यात आलेला राजापूर ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा, तसेच ओणी येथील कोवीड रूग्णालयाचा अतिरिक्त पदभार त्वरित काढून घ्यावा, अन्यथा मलाही राजीनामा देणे अपरिहार्यं ठरेल, असे डॉ. मेस्त्री यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

केंद्र शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेपेक्षा लवकर परवानगी दिल्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी सेवामुक्तीचे पत्र दिल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले आहे, असे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2021 12:02 am

Web Title: medical emergency in rajapur taluka due to resignation of four doctors akp 94
टॅग : Doctor
Next Stories
1 बंगल्यावर दरोडा घालत साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास
2 सातारा : सेल्फी काढताना तरुण ६०० फूट दरीत कोसळला; २५ तासांनंतर रेस्क्यु टीमनं वाचवला जीव!
3 “सूडबुद्धीने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर होतोय”; शिवसेना खासदार संजय राऊत यांचं टीकास्त्र
Just Now!
X