News Flash

बाहेरून औषधे आणण्याची सक्ती; वैद्यकीय अधिकारी निलंबित

येथील महिलेने तहसीलदारांकडे तक्रार केली होती.

लातूर : निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बाहेरून औषधे आणण्याची सक्ती करणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने तहसीलदारांनी खासगी औषधे दुकानावर छापा टाकला होता. अखेर संबंधित डॉ. दिनकर पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्कांना बुधवारी दिले.

उपजिल्हा रुग्णालयात करोनावर उपचार करणारी मुबलक औषधे असताना देखील येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांच्याकडून शहरातील खासगी मेडिकलमधील औषधी घेऊन या, म्हणून सक्ती करत असल्याची तक्रार एका महिलेने तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडे केली. तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात या बाबीची चौकशी केली असता करोनावर उपचार करणारे औषध रुग्णालयात असताना संबंधित वैद्यकीय अधिकारी पाटील खासगी औषधी दुकानातून औषधी का मागवून घेतात याबाबत अधिक चौकशी केली.

यामध्ये संबंधित अधिकारी व खासगी औषधी दुकानदार यांचे संगनमत असल्याच्या कारणावरून तहसीलदारांनी काही औषधे घेऊन येथील महाजन औषधी दुकानात चौकशी केली व त्यात एक महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले होते. तेव्हा छापा टाकून पावत्या जप्त करण्यात आल्या असून सरकारी दवाखान्यात कार्यरत असलेले डॉ. दिनकर पाटील व त्यांच्या पत्नी महाजन औषधी असलेल्या दुसऱ्या मजल्यावर खासगी दवाखाना चालवतात. त्यामुळेच ते औषध आणण्यासाठी सक्ती करत असल्याचे मदनसुरी येथील महिलेने तहसीलदारांकडे तक्रार केली होती. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सर्व माहिती दिली. या अहवालानुसार डॉ. दिनकर पाटील यांची या घटनेबाबत कामात निष्काळजीपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, आर्थिक फसवणूक करणे आदी कारणांचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी २८ एप्रिल रोजी शल्यचिकित्सकांनी पाटील यांनी निलंबित करावे, असे आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:10 am

Web Title: medical officer suspend for forcing to bring drugs from outside zws 70
Next Stories
1 नालेगाव अमरधाममध्ये करोनामृतांवर अंत्यविधीस विरोध
2 नगरच्या कुमुदिनीला भुईकोट किल्लय़ात मानाचे स्थान!
3 नीहार भावेच्या लघुपटास राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासह एक लाखांचे बक्षीस
Just Now!
X