हवामानशास्त्रज्ञ डॉ. रंजन केळकर यांचे मत

नाशिक : गेल्या वर्षी हवामान शास्त्रज्ञांनी मोसमी पावसाचे वेळापत्रक ठरविले. पण ते वेळापत्रक पाळणे हे पावसावर बंधनकारक नाही. आपण ठरविलेल्या चौकटीत निसर्गाने फिरले पाहिजे, हा अट्टहास आहे. निसर्गाला नियमबद्ध स्वातंत्र्य आहे. दिनदर्शिकेनुसार जूनमध्ये पाऊस दारात हजर हवा आणि सप्टेंबरमध्ये तो गेला पाहिजे, हा दुराग्रह आहे. एखाद्या वर्षी अनियमितपणामुळे पावसाचे वेळापत्रक बदलले किंवा ऋतू बदलला असे म्हणणे योग्य नाही, असे मत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ आणि भारतीय हवामान खात्याचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी व्यक्त केले.

येथील सह्याद्री संवाद कार्यक्रमात ‘यंदाचा मोसमी पाऊस’ या विषयावर डॉ. केळकर यांचे व्याख्यान झाले. मोसमी पावसाचे पूर्वानुमान, शेतीच्या दृष्टीने विपरीत हवामान, हवामान बदल आणि विज्ञानाच्या मर्यादा आदी मुद्यांवर शेतकऱ्यांशी डॉ. के ळकर यांनी संवाद साधला. यंदाच्या सुधारित अंदाजानुसार देशात १०१ टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यात पाच टक्के कमी-जास्त फरक राहील. वळवाचा किंवा अवकाळी पाऊस यात वावगे काहीच नाही. भारताच्या वार्षिक पर्जन्यमानातील ८० ते ८५ टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या चार महिन्यात तर उरलेला १५ ते २० टक्के पाऊस उर्वरित चार महिन्यात पडत असतो. त्यामुळे हा पाऊस अनपेक्षित व असामान्य नाही. तो सगळाच अवकाळी असतो हे खरं नाही. शिवाय त्याचे पूर्वानुमान योग्य वेळी केले जाते. मोसमाशिवाय पाऊस पडूच नये, ही अपेक्षाच चुकीची आहे. एखाद्या वर्षी पावसाळा लांबतो. दुसऱ्या वर्षी तो लवकर संपतो. भूतकाळातही असे झाले आहे. भविष्यकाळातही होणार आहे. याचा अर्थ ऋतू बदलला आहे असे नसते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते व तिच्या झुकलेल्या अक्षामुळे ऋतू निर्माण होतात. हवामान आणि ऋतूंच्या कालावधीचा संबंध नाही. ऋतुचक्र बिघडले आहे, अशी विधाने करणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहे. त्यांना काही आधार नसल्याचे डॉ. के ळकर यांनी नमूद केले.

heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

प्रगत किंवा पाश्चिमात्य देशातील हवामानाचे किंवा पावसाचे अंदाज आणि आपले अंदाज याची नेहमी तुलना केली जाते. आपण त्यांचे कौतुक करतो. आपल्याकडील मोसमी पाऊस हे त्याचे उत्तर आहे. आपले हवामान वेगळे आहे. आपल्यासारखा पाऊस तिकडे नाही. त्या देशांतील वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे २४ तास ३६५ दिवस आगगाडीसारखे वाहत असतात. त्यांचा अंदाज सोपा असतो. आपल्याकडे वारे खालून वर वाहतात. त्यामुळे ढग कुठे जाऊन पाऊस पाडेल ते सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी, सह््याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी या व्याख्यानाचे औचित्य साधून सह््याद्री संवाद उपक्रमाविषयीची भूमिका मांडली

हवामान अभ्यासातून पीक पद्धती निवड

आपण शेतीमध्ये पिकांचे प्रयोग करतो. काही वेळा ते यशस्वी होतात व अयशस्वी होतात. त्यासाठी हवामानाला दोष देणे योग्य नाही. आपली पीक पद्धत, वाण तपासले पाहिजे. तरुण शेतकऱ्यांनी हवामानाचा अभ्यास करुन पीक पद्धती निवडावी, असा सल्ला डॉ. केळकर यांनी दिला. आपली पारंपरिक शेती हवामानाशी निगडित आहे. शतकानुशतके हे चालू आहे. हवामान बदलले, तशी शेतीही बदलली. नवीन पिके , वाण, प्रजाती, पीक पद्धती, तंत्रज्ञान विकसित झाले आहे. एखादे पीक किंवा कृषी हवामान क्षेत्रातील पद्धती दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी होईल का, यावर सखोल संशोधनाची गरज आहे.

उन्हाळा सुसह्य का?

पावसामध्ये गारपीट होत नाही. पण इतर काळात होते. गारपीट उंच ढगांमुळे होते. अशा घटना क्वचितच घडणाऱ्या असतात. आपण त्याची माहिती ठेवावी व त्यानुसार तयारीत रहावे. महाराष्ट्रात यंदा कडक उन्हाळा पडला नाही. मार्चमध्ये तापमान ४० अंशापर्यंत गेले. पण एप्रिल, मे महिन्यातला उन्हाळा सुसह््य होता. याचा अर्थ ऋतुचœ  बदललेले नाही. वाऱ्यांची दिशा महाराष्ट्रातील तापमान ठरवतात. उन्हाळ्यात वारे राजस्थानकडून वाहू लागले तर राज्यावर उष्णतेची लाट येते. पण समुद्रावरचे दमट वारे  वाहू लागले तर तापमान आटोक्यात राहते. त्यामुळे हे सगळं वाऱ्यावर अवलंबून असते.

दुष्काळामागे भौगोलिक परिस्थिती कारक

मोसमी पाऊस नेहमी सामान्य नसतो. अशा परिस्थितीत दुष्काळ पडतो. मात्र मोसमी पाऊस सामान्य असतानाही देशाच्या काही भागात दुष्काळ असतो. हा निसर्गाचा कोप नाही. ही भौगोलिक परिस्थिती आहे. मराठवाडा हा मध्यभागी आहे. बंगालच्या उपसागरातील वारे तेथपर्यंत पोहोचत नाहीत. अरबी समुद्रावरील वारे तेथे पोहचेपर्यंत मंदावतात. या परिस्थितीवर उपाय नाही. मात्र ती समजून घेतली पाहिजे. गेल्या दीडशे वर्षांचा इतिहास पाहिला तर मोसमी पावसात चढ-उतार होत राहतात. त्यात कोणतीही दीर्घकालीन प्रवृत्ती नाही. हवामानाच्या प्रत्येक घटनेला बदलाचे चिन्ह किंवा पुरावा समजू नये. तसा निष्कर्षही काढू नये. अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ या घटना पूर्वीही झाल्या आहेत. भविष्यातही होत राहतील, असे डॉ. केळकर यांनी नमूद केले.

अतिवृष्टीला मोसमी वारे जबाबदार नाहीत

अतिवृष्टी हा एक परवलीचा शब्द बनला आहे. अतिवृष्टीला आणि नुकसानीच्या सर्व घटनांना मोसमी वाऱ्यांना दोष देणे चूक आहे. भूतकाळातही अशा घटना झालेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शहरी पूर ही नवी समस्या आहे. त्यामागची कारणे नवीन आहेत. पावसाचे पाणीच वाहून गेले नाही तर शहरे पाण्यात बुडतात. अवैध बांधकामे, अपुरी गटार व्यवस्था ही त्याची कारणे आहेत.